देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (आय.आय.टी., मुंबई) यांनी आयोजित केलेल्या ‘आपले प्रश्न आपले विज्ञान: २०२२-२३’ या संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. सदर संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धा डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती.महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील प्रथम वर्ष, कला या वर्गात शिक्षण घेणाऱ्या प्रतीक्षा म्हेतर, सानिका जठार, श्रुतिका चव्हाण आणि सारिका माने या चार विद्यार्थिनींनी ‘देवरुख शहरातील रस्त्यावरील फेरीवाले आणि किरकोळ विक्रेत्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर संशोधन प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे हे यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थिनींना समाजशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. विकास शृंगारे आणि प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर संशोधन प्रकल्पाद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच व्यापाऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन त्यांचे विविध प्रश्न अधोरेखित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हेतू समोर ठेवून संशोधन करण्यात आले होते.
महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शन शिक्षकांचा छोटीखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित केले. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी दैनंदिन अध्ययनासोबत नियमित समाजामध्ये होणारे बदल याबाबत दक्ष असले पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक घडामोडी याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी प्रिंट आणि डिजिटल मीडिया सोबत संदर्भ ग्रंथांचा अधिकाधिक वापर करून स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. वाचन, निरीक्षण, मनन व चिंतन हे संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.याप्रसंगी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. सागर संकपाळ, प्रा. धनंजय दळवी आणि सहाय्यक महेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.