
नूतन विद्यामंदिर ओणीच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर
राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील नुतन विद्यामंदीर ओणीच्या १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर शालेच्या प्रांगणात ‘स्नेह ऋणानुबंध’ कार्यक्रमा निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत शालेय आठवणींना उजाळा दिला. तर गुरूजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करत केलेल्या आदरातिथ्याने गुरूजनही भारावून गेले.
नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या या गेट दुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर यांनी भुषविले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, माजी प्राचार्य शहाजीराव खानविलकर, श्री. शिंदेदेसाई, विद्यमान प्राचार्य तानाजी शिंदे, वात्सल्य मंदीरचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन गुजर यांच्यासह संस्था पदाधिकारी, आजी-माजी शिक्षकवृंद आणि १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
तब्बल २८ वर्षानंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांसह आजी-माजी शिक्षकवृंद, संस्था पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. जीवनातील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये पालक, शिक्षक आणि प्रशाला यांच्या महत्वपूर्ण योगदान अधोरेखित करताना माजी विद्यार्थ्यांनी सर्वाप्रति कृतज्ञतता व्यक्त केली. शिक्षणानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहूनही शाळेसह गुरूंजनांच्या आठवणी आजही जपल्याबद्दल शिक्षकवृंद आणि मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुकही केले.
यावेळी योग्य मार्गदर्शन आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूजनांचे पूजन करीत गुरूजनांप्रती आणि शाळेला भेटवस्तू देत आदरयुक्त कृतज्ञतताही व्यक्त केली. विद्यार्थी आणि शाळा भेटीचा या अनोखा स्नेहमेळावा आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या कृतज्ञततेने गुरूवर्यही भारावून गेले.
या कार्यक्रमाचे औचित्य बॅचमेट आणि प्रगतीशिल शेतकरी दयानंद चौघुले , खरवतेचे माजी सरपंच दिनेश चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.तर यावेळी माजी विद्यार्थ्यांचे वतीने वात्सल्यमंदिरला आर्थिक मदत व भेटवस्तु देत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सुनिल चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. तर, या कार्यक्रमाचे प्रस्तावित जयवंत भारती, सूत्रसंचालन प्रकाश नमसले, रामचंद्र चौगुले यांनी आणि आभार संतोष जड्यार यांनी मानले.











