दापोली | प्रतिनिधी : भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आयोजीत टाटा कम्युनिकेशन मुंबई पुरस्कृत तसेच रत्नागिरीतील विविध संघटनाच्या मदतीने दापोली येथे अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलांकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिर दि. २१/३/२३ ते १९/४/२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेचे चौथे पुष्प गुंफताना प्रमुख वक्ता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक अरुण ढंग उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला, प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाचे स्वरूप विशद करताना म्हणाले की, ” या शिबिराच्या माध्यमातून उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योग संधी निवड व शोध, उद्योगाशी निगडीत सरकारी व निमसरकारी योजनांची माहिती, बँकेच्या कर्जयोजना, बाजारपेठ सर्वेक्षण आदी बाबीचा अंतर्भाव असल्याचे नमूद केले.”
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहा. प्रा. अरुण ढंग म्हणाले की, ” उद्योजक राष्ट्राच्या प्रगतीचा कणा आहेत कारण ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात.उद्योजक हा नावीन्य निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. त्याच्या मनातील नवीन नवीन कल्पना साकार करण्याच्या प्रयत्नात असतो, तो तेवढ्यावर न थांबता पुन्हा पुढे नवीन शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. यावेळी त्यांनी प्रेरणादायी देश-विदेशातील उद्योजकांची ओळख करून दिली.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिनाक्षी शेडगे आणि आभार सौ. स्वरा मोहिते यांनी केले. यावेळी महिला प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होत्या.