रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिन व गुढीपाडवा, नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित उद्योगिनी व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाची रविवारी उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्या अॅड. शबाना वस्ता, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे व दिशा साळवी आणि सामाजिक कार्यकर्त्या, ग्राहक पेठेच्या संचालिका प्राचीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
शांतीनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात या प्रदर्शनाला महिलांची भरपूर गर्दी झाली होती. बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राची शिंदे आणि शकुंतला झोरे यांनी पुष्परोपटे देऊन केला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या अॅड. शबाना वस्ता यांनी प्राचीताई शिंदे यांचे विशेष कौतुक केले. गेली १७ वर्षे प्राचीताई महिला उद्योगिनी, बचत गटांना एकत्रित आणून व्यासपीठ देत आहेत, असे सांगितले. त्या एक चालती बोलती उर्जा आहे. त्यांना महिला बचत गटांना साथ दिला आहे. प्रदर्शन खूप छान वाटले. सर्व उद्योगिनींचा उत्साह चांगला आहे, तो असाच टिकून राहू दे. या उत्साहातून आपली उज्ज्वल वाटचाल होऊ, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा भट यांनी केले. प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यात प्रश्नमंजुषा, स्पॉट गेम, फनी गेम्स, पाककला स्पर्धा आयोजन केले. बक्षीस वितरण सोहळ्यानतर आंबेशेत, वायंगणकरवाडी येथील श्री साई सेवा महिला मंडळाने पालखी नृत्य सादर केले. यातील महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात पालखी नृत्याचे सुमारे पंचवीस प्रकार सादर केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. श्री साई सेवा महिला मंडळाचा सत्कार संचालिका प्राचीताई शिंदे यांनी केला.
स्पर्धांतील विजेत्यांची नावे
पाककला स्पर्धा- गोड पदार्थ- प्रथम क्रमांक- कीर्ती मोडक, द्वितीय- प्रांजल कदम, तिखट पदार्थ- प्रथम- प्रज्ञा फडके, द्वितीय- राधा पाथरे, तृतीय किर्ती मोडक, उत्तेजनार्थ- शरयू मोघे. संगीत खुर्ची- प्रथम- अनघा पाटील, द्वितीय- अमिता घाटगे, तृतीय- नेत्रा साळवी, डोळे बांधून डबा फोडणे- प्रांजल कदम, टिकल्या चिकटवणे- प्रथम- संध्या नाईक, द्वितीय- दुर्वा सावंत. रस्सीखेच- प्रथम क्रमांक- सिद्धी मलुष्टे, वैभवी साळवी, सुप्रिया गुरव, सोनाली शिंदे, निलिमा सुर्वे, योगिता बेलवलकर, पायल गांधी, स्वाती रामाणे. द्वितीय क्रमांक- नेत्रा साळवी, अमिता घाडगे, आदिती कलये, रचना वेतोसकर, जान्हवी भुरवणे, अस्मी चव्हाण, धनश्री करमरकर, अश्विनी शेलार. ग्रुप गेम- प्रथम- किर्ती मोडक, द्वितीय- आकांक्षा कीर, तृतीय- तीर्था पेडणेकर.