वनसेवक बबन रेडकर यांचा वन विभागातर्फे सन्मान

सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करीत दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी वनविभागातील नेमळे नियत क्षेत्राचे वनसेवक रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांचा वनविभागातर्फे सेवा निवृत्तीपर सत्कार करण्यात आला. उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते बबन रेडकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नवकिशोर रेड्डी यांनी त्यांच्या भावी जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वनसेवक बबन रेडकर यांनी आपल्या वनविभागातील प्रदीर्घ सेवेच्या कालावधीत अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या नियमित सेवे बरोबरच वन्य जीवांच्या संरक्षणासाठी व त्यांना जीवदान देण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असेच आहे.

आज आपल्या नियत वयोमानानुसार ते या सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र, उर्वरीत आयुष्यात देखील त्यांनी आपली सेवावृत्ती व प्राणीमात्रांप्रती असलेली भूतदया कायम ठेवत हे कार्य असेच अखंडीतपणे सुरु ठेवावे. त्यांच्या भावी जीवनात त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दांत नवकिशोर रेड्डी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक श्री.लाड , वन क्षेत्रपाल मदन क्षीरसागर, निवृत्त विभागीय वनअधिकारी श्री.सुभाष पुराणिक, सौ. लक्ष्मी रेडकर तसेच वनविभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वच सहकाऱ्यांकडून बबन रेडकर यांना सेवा निवृत्तीपर शुभेच्छा देण्यात आल्या. बबन रेडकर यांनी यावेळी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.आपल्याच सेवा कालावधीत वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल आपण सर्वांचा ऋणी आहे अशा शब्दात त्यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर त्यांना सन्मानपूर्वक वन विभागाच्या विशेष वाहनाने घरी सोडण्यात आले.