‘कशेडी बोगद्यालगतचे ‘हाईट खांब’ उखडले

अवजड वाहतुकीच्या नियंत्रणासाठी उभारले होते ‘हाईट खांब’, दिवस-रात्र दुतर्फा धावताहेत अवजड वाहने
 खेड(प्रतिनिधी) मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून दुतर्फा मार्गस्थ होणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राने उभारलेले ‘हाईट खांब’ अवघ्या दोन दिवसातच उखडल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवाराच उडाला आहे. कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक केवळ हलक्या वजनाच्या वाहनांसाठीच असताना देखील अवजड वाहने मार्गस्थ होत असल्याने अन्य वाहनचालकांतील गोंधळ कायमच आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने या बाबीकडे अद्यापही फारसे गांभिर्याने लक्ष न दिल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी कायमच आहे.
उन्हाळी सुट्टी हंगामासह लोकसभेच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनापासून कशेडी बोगद्यातील दुतर्फी वाहतूक खुली झाली आहे. मात्र, वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ अजूनही कायमच आहे. अवजड वाहने दोन्ही बाजूने मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवून वाहतूक कोंडी देखील होत आहे. अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलिसांनी पोलादपूर हद्दीतील भोगाव व तालुक्यातील खवटीनजीक अनुसया हॉटेलजवळ ‘हाईट खांब’ उभारण्याचा अवलंब केला.
बोगद्यापासून काही अंतरावर उभारण्यात आलेले हाईट खांब अवघ्या दोन दिवसातच उखडले आहेत. रात्री अथवा पहाटेच्या सुमारास पोलीस नसल्याची संधी साधून अवजड वाहनांची वाहतूक करणाऱ्या चालकांनी ‘हाईट खांबच उखडल्याचे समोर आले आहे.
कशेडी बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूक सुरू असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याने अजूनही ‘हाताची घडी अनू तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या नियोजनशून्य कारभारामुळेच वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून वाहतूक पोलिसांची डोकेदुखी कायमच आहे. रहिवारीही वाहनांच्या वाढलेल्या बेसुमार संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवरच आला.
दुतर्फा बोगद्यातून मार्गस्थ होणाऱ्या अवजड वजनांच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळच उडाला. यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा प्रवास वेगवान अनू आरामदायी झाला असला तरी अजूनही गोंधळ कायमच असल्याने वाहनचालकांनाही जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने ही बाब गांभिर्याने घेऊन अवजड वाहतुकीच्या वाहनांना दुतर्फा वाहतुकीसाठी मज्जाव  करण्याबाबतचे आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग खाते कोणती भूमिका घेते, याकडेच वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
अवजड वाहतुकीचे चालक मागताहेत ‘आदेश’
कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक केवळ हलक्या वजनाच्या वाहनांसाठीच खुली झाली असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून देण्यात येत असले तरी याबाबतचे लेखी आदेश अवजड वाहतुकीचे वाहनचालक मागत असल्याने कशेडी येथील वाहतूक पोलिसांची कोंडी झाली आहे. याचमुळे वाहतूक पोलिसांनी उभारलेले ‘हाईट खांब’ उखडण्याचे प्रताप अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांकडून करण्यात आले असून वाहतुकीला लागलेला ‘ब्रेक’ नावापुरताच ठरला आहे.
यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा अवजड वाहतुकीची वाहने पुन्हा मार्गस्थ होऊ लागली आहेत. वाहतूक व्यवस्थेचा पुरता फज्जाच उडाला आहे.