क्रशरमुळे ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिराला होणार धोका
उत्खननामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रवाह विरुद्ध दिशेला जाऊन पाणी टंचाईची शक्यता
क्रशरला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे
कोल्हेवाडी ग्रामस्थांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच लांजा तहसीलदारांना निवेदन सादर
लांजा | प्रतिनिधी : कोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या दगड क्रशरला येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या क्रशरचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊन क्रशची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे.कोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या दगड क्रशरमुळे ग्रामदैवत केदारलिंग मंदिरात धोका संभवतो. तसेच उत्खननामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रवाह विरुद्ध दिशेला जाऊन पाणी टंचाईची शक्यता तसेच गावातील लगतच्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये जाण्याचे मार्ग बंद होऊ शकतात आणि म्हणूनच ग्रामस्थांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
जिल्हाधिकारी तसेच लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजे कोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दगड उत्खनन (क्रशर) करण्यासाठी श्री.रवी इन्फाबिल्ड प्रोजेक्ट प्रा.लि. उदयपूर राजस्थान तर्फे श्री. सुनिल विष्णू प्रसाद ,श्री. वास्तव यांचे दगड उत्खनन खडी क्रशर परवानगीसाठी दि. १८/०७/२०२२ रोजी पत्र ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाले होते. हा विषय सरपंचांनी दि.२१/०७/२०२२ रोजीच्या ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये उपस्थित केला असता सदरहू परवानगी ग्रामपंचायत सदस्यांनी न देता ग्रामसभेची परवानगी घेऊन हा विषय ग्रामसभेच्या अजिंडयावर घेवून त्यासाठी विशेष ग्रामसभा घेवून या अर्जाचा फैसला करावा असे ठरविण्यात आले. त्यानंतर हा विषय दि. २२/०८/२०२२ रोजीच्या ग्रामसभेमध्ये आयत्या वेळच्या विषयामध्ये सरपंचांनी हा विषय घेतला असता ग्रामसभेने बहुमताने या प्रस्तावास विरोध केला आणि दगड क्रशरला परवानगी देऊ नये असा ठराव क्र.०६/०२ करुन परवानगी नाकारण्यात आली.
असा ठराव होऊनही सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि दोन ग्रामपंचायत सदस्य यांनी कोणालाही विश्वासात न घेता तसेच कोणतीही विशेष ग्रामसभा न लावता स्वतःच्या मनमानीने या क्रशरला नाहरकत दाखला दिला.सदर क्रशर प्लॅटमुळे आमच्या ग्रामचे ग्रामदैवत श्री. केदारलिंग या मंदिरास धोका संभवतो. त्याचप्रमाणे सदर उत्खनन ज्या जागेत होणार आहे. त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने दुर्मीळ असलेला खवले मांजर याचा अधिवास आहे. आणि गावच्या भूरचनेच्या दृष्टीने विचार करता जर उत्खनन केले, तर भूगर्भातील पाण्याचे प्रवाह हे विरुद्ध दिशेला जाऊन गावात पाण्याचे दुर्भिक्ष होऊ शकते. तसेच गावातील लगतच्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जाण्याचे मार्ग बंद होऊ शकतात.
या बाबी सरपंचांच्या निदर्शनास दि. २७/०३/२०२३ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये दिल्या गेल्या. तर सन २०१२ मध्ये हा क्रशर लोकांच्या उद्रेकामुळे बंद करण्यात आला होता. म्हणूनच या क्रशरचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊन क्रशची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व लांजा तहसीलदार यांना निवेदन देताना कोलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य राजेंद्र घडशी, संजय सावंत सदस्य, संदेश सावंत, रवींद्र सावंत, गणेश सावंत, सुभाष सावंत,बाळकृष्ण पाष्टे ,गावकर रवींद्र आग्रे ,सुनील पांचाळ आण्णा पांचाळ,प्रसाद पांचाळ ,
अन्य गावकरी मंडळी. उपस्थित होते.