पोईप हायस्कूल इमारतीसाठी सर्वतोपरी सहकार्य : उद्योजक दत्ता सामंत यांचे प्रतिपादन

पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचालित “श्री सिद्धिविनायक सभागृह” उद्घाटन सोहळा दिमाखात

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील पोईप येथील पोईप हायस्कूल ही संस्था संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावारूपाला येत असून या संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेला “सिद्धिविनायक सभागृह” सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असे आहे. या सभागृहाच्या माध्यमातून हायस्कूलला पुढे भविष्यकाळात आर्थिक उत्पन्नाचा स्तोत्र निर्माण होईल. पंचक्रोशीतील, दशक्रोशीतील गरजू व गरिबांना या सभागृहात आपली कामे, कार्यक्रम करण्यासाठी संस्थेच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोईप हायस्कूलचे कार्य संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत असे आहे. यापुढे हायस्कूलची जुनी इमारत नुतनीकरणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योजक दत्ता सामंत यांनी दिली.

पाईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिरा वर्दम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक सभागृहाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर, माजी मुख्याध्यापक – शिवाजीराव देसाई, पोईप सरपंच श्रीधर नाईक, मसदे-चुनवरे – सरपंच श्रेया परब, मर्चंट नेव्ही सेवानिवृत्त अधिकारी – श्री. ठाकूर, संस्था उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, परशुराम नाईक, विलास माधव, कमलेश प्रभू, महेश पालव, नामदेव पुजारी, श्रीकृष्ण माधव, विश्वनाथ पालव, दाजी मसदेकर, महेंद्र पालव, दादा नाईक, राजेंद्र प्रभूदेसाई, अरुण मेस्त्री, सत्यवान पालव, बाबू आंगणे, भाऊ परब, बाबुराव चिरमुले, मुख्याध्यापक विकास कुंभार व दशक्रोशीतील ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

दहा वर्षांपूर्वी सदर सभागृहाचे भूमिपूजन होऊन सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने त्यावेळी सात लाख रुपयाचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर संस्थेच्या वतीने विविध देणगीच्या माध्यमातून सभागृहाचे काम पूर्ण करून आज अद्यावत असे सभागृह उभे झाले आहे. पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक तसेच सर्व शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, यांच्या चांगल्या सहकार्यानेच सदर सभागृह काम पूर्णत्वास गेल्याचे अध्यक्ष -अनिल कांदळकर यांनी सांगितले. यावेळी मर्चंट नेव्ही अधिकारी ठाकूर बाबा परब, शिवाजीराव देसाई व इतरांनी सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आपले मनोगत व्यक्त केले आपल्या भाषणातून पुढे प बोलताना दत्ता सामंत यांनी संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर व इतर संस्था चालक यांचे गौरवोद्गार काढले.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोईप हायस्कूल इमारतीसाठी 50 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून सदर निधी लवकरच पोईप हायस्कूलला मिळेल अशी अपेक्षा दत्ता सामंत यांनी व्यक्त करून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर सभागृह सर्व धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अनिल कांदळकर यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता मोरजकर आणि प्रास्ताविक विकास कुंभार सर तर आभार – विष्णू महाजन यांनी व्यक्त केले