Organized “Swatantryveer Savarkar Samman Yatra” on 8th April at Vengurle
हिंदू धर्माभिमानी मंडळींचा पुढाकार : सावरकर प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
वेंगुर्ले : प्रतिनिधी l वेंगुर्ला येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्या वतीने शनिवार दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता “स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा वेंगुर्लावासियांची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथून सुरू होणार असून पुन्हा तेथेच विसर्जित होणार आहे.
वेंगुर्ले येथील या यात्रा विषयासंदर्भात एक नियोजन बैठक श्री देव रवळनाथ मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीस वेंगुर्ल्यातील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ला प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे, मंत्री आप्पा धोंंड, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, राजन गिरप, सुषमा खानोलकर, रा.स्व.संघाचे मंदार बागलकर, बाबुराव खवणेकर सर, अमित नाईक, गुरुप्रसाद खानोलकर, महादेव तथा भाऊ केरकर, अजित राऊळ सर, भूषण पेठे, गिरीश फाटक, सचिन वालावलकर, सुनील डुबळे, उमेश येरम, अभी वेंगुर्लेकर, शेखर काणेकर, रविंंद्र शिरसाठ तसेच समस्त हिंदू धर्माभिमानी आणि नरेंद्र महाराज संप्रदायाचे कार्यकर्ते प्रतिनिधी परमानंद करंगुटकर, शेखर राणे, निलेश बोंद्रे व शिवा तारी उपस्थित होते. सावरकरांवर टीकेची झोड उठवून वातावरण गढूळ करणाऱ्यांच्या दुष्कृत्यांवर सद्विचारांची तुरटी फिरवण्याच्या व वातावरण पवित्र करण्याच्या दृष्टीने सन्मानयात्रा संपल्यानंतर ठीक सहा वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात हरिभक्त परायण “संदीप बुवा माणके, पुणे” यांचे अभ्यासपूर्ण ‘कीर्तन’ होणार असून कीर्तनाचा विषय *हिंदुधर्माभिमानी सावरकर* असा असणार आहे. कीर्तनाच्या समारोपानंतर श्री नरेंद्र महाराज संप्रदायाकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून वेंगुर्ला तालुक्यातील सावरकर भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.