देव्हारे पंचक्रोशीत मान्सुन पुर्व पावसाने जागविल्या निसर्ग चक्री वादळाच्या स्मृति, 33 घरांचे 7 लाख 48 हजार रुपयांचे नुकसान, महसुलकडून पंचनामे सुरु.
मंडणगड | प्रतिनिधी : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 13 मे 2024 रोजी तालुक्यात वादळी वारे व विजांच्या लखलखाटासह हजेरी लावलेल्या मान्सून पुर्व वादळी पावसाने देव्हारे पंचक्रोशीत नागरीकांच्या निसर्ग चक्री वादळाच्या स्मृति जागृत केल्या. (13) मे 2024 रोजी सायंकाळानंतर आसमंतात अचानक ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सुमारे एक ते दीड तास कोसळत होता.
बहुदा समुद्राकडील बाजूने म्हणजे वेळास पट्यात वाऱ्याचा प्रवाह जोरदार असल्याने किनाऱ्या लगतची गावे व देव्हारे पंचक्रोशीत पाच ते सात मिनीटांचे जोरदार वादळ आले. यामुळे काही घरांचे पत्रे उडाली, झाड्यांच्या फाद्या मोडल्या, झाडे उन्मळून पडली. व नंतर एक तास मुसळधार पाऊस पडला. देव्हारे पंचक्रोशीत मान्सनुचे आधी हजेरी लावलेल्या पावसाने 33 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या घरांचे सुमारे 7 लाख 48 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे. महसूल विभागाच्या वतीने अजूनही गावांमध्ये पाहणी व पंचनामे सुरु आहेत.
यात वेळास, बाणकोट, धामणी, देव्हारे, बोरखत, सावरी या गावात घराचे नुकसान झाले. मंडणगड तहसिल कार्यालयाचेवतीने नुकसान झालेल्या घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची सुरुवात झाली असून या संदर्भात नुकसानीचा आकडा पंचनामे पुर्ण झाल्यावरच कळू शकेल. दरम्यान देव्हारे पंचक्रोशीतील नागरीकांमध्ये पाऊस व वादळी वाऱ्याने काही काळाकरिता का होईना चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. व निसर्ग चक्री वादळाच्या स्मृती जागृत झाल्याची येथील नागरीकांनी सांगीतले आहे.
चौकट – आमदार योगेश कदम यांनी वादळी पावसाने नुकसान झालेल्या देव्हारे पंचक्रोशी येथील नुकसान ग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त घरांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला केल्या.












