इंदौरमध्ये काल (बुधवारी) रात्री उशिरा झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंदौर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लादजवळ हा अपघात झाला आहे.
मध्य प्रदेशातील इंदौर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.
एका अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह ८ जणांचा समावेश आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक गुना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बुधवारी (ता. १५) ते कारने अलीराजपूरच्या बोरी गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते.कार्यक्रमवरून परतत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लोक जमा झाले आणि त्यांनी बचावकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून मृतदेह बेटमा रुग्णालयात आणण्यात आले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू आहे.












