वाटूळचे सेवानिवृत्त क्रिडा शिक्षक कृष्णा खांबे यांचे निधन

 

राजापूरl  प्रतिनिधी : तालुक्यातील वाटूळ गावचे प्रतिष्ठीत ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त क्रिडा कृष्णा दौलू खांबे (८५) यांचे शुक्रवारी ह्दविकाराच्या तीव्र झटक्याने रहाते घरी निधन झाले. राजापूर अर्बन बँकेचे आयटी अधिकारी प्रसन्न खांबे व स्थानिक गुन्हा अन्वेशन विभाग रत्नागिरी येथील पोलीस कर्मचारी प्रविण खांबे यांचे ते वडील होत.

मुळचे सांगली जिल्हयातील चिकुर्डे गावचे रहिवाशी असलेले कृष्णा खांबे हे नोकरीच्या निमित्ताने वाटूळ गावात आले. प्रारंभी काही काळ त्यांनी नुतन विद्या मंदिर ओणी प्रशाळेत क्रिडा शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते वाटूळ गावातील आदर्श विद्यामंदिर वाटूळ प्रशाळेवर क्रिडा शिक्षक म्हणून रूजू झाले व तेथूनच ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. एक शिस्तप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. कब्बड्डी, खो खो, मल्लखांब या क्रिडा प्रकारात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात वाटूळ प्रशाळेच्या संघानी अत्यंत चमकदार कामगिरी केली. त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

वाटूळ गावातच ते स्थायिक झाले, वाटूळ गावच्या शैक्षणिक, राजिकय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा कायमच हिरिरीने सहभाग असे. आण्णा या टोपण नावाने व खांबे गुरूजी या नावानेही ते ओळखले जात.

शुक्रवारी सकाळी त्याना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजापूर अर्बन बँक परिवारसह वाटूळ व परिसरातील अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली व खांबे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

त्यांच्या पश्चात प्रसन्न व प्रविण असे दोन विवाहित मुलगे, तीन विवाहित मुली, दोन सुना, तीन जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता वाटूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.