श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळ हातखंबा डांगेवाडी पुरस्कृत पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय राम-सीता स्वयंवर भव्य नाटयमय स्पर्धेमध्ये श्री गणेश मित्रमंडळ (मिरजोळे -पाडावेवाडी) या मंडळाने प्रथम येण्याचा मान मिळविला. द्वितीय क्रमांक आई जुगाई नमन मंडळ, (नरबे घाणेकरवाडी) या मंडळाने पटकावला. तृतीय क्रमांक सांब जुगाई नमन मंडळ (पानवळ शाखा नं. १) या मंडळाने मिळविला. विजेत्या संघांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले. या सर्व विजयी स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
५०० वर्षानंतर अयोध्येला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व जगभर राम भक्तांनी हा सोहळा याचि देही याची डोळा पाहिला. हे आनंदाचे वर्ष म्हणून मंडळाच्या वतीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये श्री गणेश मित्रमंडळ, (पाडावे वाडी-मिरजोळे), आई जगाई नमन मंडळ (नरबे, घाणेकरवाडी), सांब जुगाई नमन मंडळ, (पानवळ शाखा नं. १), शिवशक्ती नमन मंडळ (सांबरेवाडी) तसेच श्री महालक्ष्मी नमन मंडळ (कोतवडे) या मंडळांनी सहभाग घेतला होता.
पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गराटे यांनी सर्व कलाकारांचे मनभरुन कौतुक केले. या कार्यक्रमात डांगेवाडी आदर्श शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र सनगरे, गावचे माजी सरपंच दत्ताराम सनगरे, सुनिल भोसले, मुंबई मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक व इतर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले. मंडळाचे मुंबईचे कार्यकर्ते विजय धाकू डांगे यांनी मंडळाला दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुनिल सखाराम डांगे यांनी प्रास्ताविक केले. सल्लागार प्रकाश सोनू डांगे यांनी या वेळी मंडळाच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय राम-सीता स्वयंवर भव्य नाटयमय स्पर्धेसाठी अभ्यासू व उत्कृष्ठ परीक्षणातून नमन मंडळाना मोलाचे मार्गदर्शन करणारे गणपत तारवे, योगेश मेस्त्री, श्रीकांत बोंबले, शेखर मुळये व निखिल भुते यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर समालोचन व निवेदन मंडळाचे सचिव प्रथमेश डांगे व सदस्य आदेश डांगे यांनी समर्थपणे केले. ही स्पर्धा पार पडण्यासाठी रवळनाथ रिमिक्स-लय भारी या नमन मंडळाचे कलाकार व उत्कृष्ट गायक अमित डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.











