माखजनकरांसाठी वैभव शेट्ये झाले ‘भगीरथ’

भागवली शुद्ध पाण्याची तहान; संगमेश्वरातील पाहिला उपक्रम

माखजन | गौरव पोंक्षे 
घरा बाहेर पडलं की पिण्याच्या पाण्याची गरज भासली की एक लिटर पाण्यासाठी तब्ब्ल २० खर्च करून मिनरल वॉटर ची बाटली विकत घ्यावी लागते.उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडल्यावर या पाण्यावर होणाऱ्या खर्चाचा अनुभव सर्वांनाचं आहे.
हिच शुद्ध व थंड पाण्याची गरज अर्थात ज्या पाण्यावर सॅन्ड फिल्टरेशन,ऍक्टिवेटेड चारकोल फिल्टरेशन,यु.व्ही.ट्रीटमेंट,रिव्हर्स ओसमॉसिस,ओझोनेशन,अडेड मिनरल आदी प्रक्रिया केलेले पाणी आपण लोकांना अत्यल्प दरात् देऊ शकलो तर लोकांची फार मोठी सोय होईल हे लक्षात आल्यावर माखजन चे सुपुत्र वैभव महादेव शेट्ये यांनी आपल्या माखजन येथील घरात पाणी शुद्धी करणाचा प्रकल्प् स्वखर्चाने सुरु केला.
पाण्याचा मोबदला इतकाच ठेवला की त्यामध्ये विजभार व अन्य दुरुस्ती होऊ शकेल.
या प्रकल्पातून कुणीही व्यक्ती स्वतः २४ तास पाणी घेऊ शकतो.५ रुपयांचे नाणे टाकले तर ३ लिटर पाणी मिळते.१० रुपयाचे नाणे टाकले तर ७ लिटर पाणी मिळते.या पटीत आपण कितीही पाणी घेऊ शकतो.या प्रकल्पामुळे गरजूला ज्याठिकाणी १ लिटर पाण्याला २० रुपये मोजावे लागत होते,ते आता फक्त १ लिटर साठी १ रुपया ४२ पैसे मोजावे लागणार आहेत.या मशीनारीला वाय फाय सिस्टिम कनेक्ट असल्याने यु.पी.आय. द्वारे सुद्धा पाणी मिळवता येणार आहे. हा प्रकल्प जनतेसाठी एखाद्या व्यक्तीने सुरु करावा ही संगमेश्वर तालुक्यातील पाहिलीच घटना आहे.जिल्ह्याचा विचार केला तर अपवाद असू शकतो.
वैभव शेट्ये हे स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर असून अमेरिका,भूतान,अशा बाह्य देशात् व्यवसायानिमित्त होते.जगात पाहिलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या मूळ गावात व परिसरात व्हावा या हेतूने हा प्रकल्प् सुरु केला असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाना सांगितले.या प्रकल्प उभारणीसाठी सुमारे ५ लाख खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले.या अनोख्या प्रकल्पाचे माखजन सह पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.असे प्रकल्प महत्वाच्या ठिकाणी,शहरात बसल्यास महागाई च्या दिवसात अल्प दरात सर्व प्रकारची ट्रीटमेंट केलेले थंड पाणी नागरिकांना मिळू शकेल.
माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.यातून प्रेरणा घेऊन माखजन येथे असणाऱ्या नगरबावीवर असा प्रकल्प माखजन ग्रामपंचायत चालू करण्यासाठी प्रयत्न करेल, असे महेश बाष्टे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.यावेळी ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य,व्यापारी उपस्थित होते.