
पेडणे : निवृत्ती शिरोडकर
पेडणे तालुक्यातील न्हयबाग जंक्शन येथे ट्रक आणि स्कूटरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील सुनीता राजाराम नाईक (५०, रा. तोरसे) या महिलेचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ येथील पंडित नाईक (४७) हा ट्रक (जीए ०१ यू २५४३) न्हयबागच्या अंतर्गत रस्त्यावरून पत्रादेवी बाजूच्या दिशेने घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला ठोकरून अपघात झाला. महामार्गावर पोहोचताच मालपेहून पत्रादेवीच्या दिशेने जात असलेल्या स्कूटरला ट्रकची जोरदार धडक बसली. यात स्कूटरस्वार राजाराम नाईक (५८) आणि त्यांची पत्नी सुनीता (५०, रा. तोरसे) रस्त्यावर पडले. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, तत्पूर्वीच सुनीता नाईक यांचा मृत्यू झाला.
पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विवेक हळदणकर, एरिक फर्नांडिस, शशांक साखळकर आदीनी पंचनामा केला.
———–











