नगर परिषद प्रशासनाची सोयीस्कर डोळेझाक
भराव मातीमुळे पावसाळ्यात आपत्तीची शक्यता
राजापूर (प्रतिनिधी): शासनाचा कोटयावधीचा निधी खर्चुन राजापूर शहरात नगर परिषदेमार्फत होणारी विकासकामे ठेकेदारांच्या मनमानीमुळे शहरातील नागरिकांच्या नुकसानीस कारणीभुत ठरत आहेत. ठेकेदार प्रशासनाच्या आदेशानाही केराची टोपली दाखवत असल्याने राजापूर नगर परिषदेमध्ये सध्या प्रशासनापेक्षा ठेकेदारांचेच राज्य सुरु असल्याचा आरोप नागरिकांतुन होत आहे . विकासकामे करताना निर्माण झालेली माती , दगड न काढता त्याच ठिकाणी एका ठेकेदाराने तशीच ठेवल्याने शहरातील वहाळी व नागरिकांचे रस्ते बंद झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे . तर या मातीमुळे पावसाळ्यात नागरिकाना नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.या ठेकेदाराच्या मनमानी विरोधात आणि नगर परिषद प्रशासनाच्या बोटचेपे धोरणाविरोधात नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजापूर शहरातील गुजराळी भागातील मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वहाळीवर जुनाट झालेल्या भावे पुलाचे नव्याने आरसीसी बांधकाम नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले. सदर काम करतांना बाग काझी भागाकडे जाणारा रस्ता बंद होऊ नये म्हणून ठेकेदाराने या वहाळीलगत असलेल्या परांजपे यांच्या कंपाउंड मधून तात्पुरता रस्ता तयार केला होता. तो रस्ता वहाळीमध्ये बंधारा बांधून तयार केला गेला. सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यावर सदर बंधारा वहाळी मधून हटवणे व वहाळी मोकळे करणे गरजेचे होते.
पावसाळी हंगाम जवळपास चालू झाला असून सदर वहाळीला जोरदार पाण्याचा प्रवाह असतो. सदर बंधाऱ्यामुळे वहाळी मध्ये पाणी साठून रस्त्यावरून जाणारे पादचारी, वाहनधारक तसेच आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांची कंपाऊंड यामध्ये असलेल्या त्यांच्या गाड्या व अन्य सामान यांची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते याबाबत येथील नागरिकानी प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करुन व उद्भवणारी परिस्थिती, आणि वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनाला आणूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.
या वहाळीत टाकण्यात आलेला हा मातीचा भराव तसाच राहिल्यामुळे येथील नागरिकांच्या शेतात पाणी जाण्याचीही शक्यता आहे . तर आजुबाजुचा परिसरही पाणी भरल्याने बंद होण्याची शक्यता आहे . त्याचप्रामाने झरी रोड येथे करण्यात आलेल्या संरक्षक भिंतीच्या कामातुन निर्माण झालेली मातीही याच ठेकेदाराने तशीच ठेवली आहे परिणामी ही माती पावसाळ्यात वाहत जावुन नागरिकांच्या घरासह रस्त्यावर येण्याची शक्यता आहे .
तर अर्जुना नदीपात्रात केलेले पिराचे बांधकाम करतानाही याच ठेकेदाराने सगळा भराव तसाच नदीपात्रात ठेवला आहे त्यामुळे नदीचे पात्र बदलुन शहराला पुराचा धोका वाढु शकतो . याबाबत नागरिकानी अनेक वेळा तक्रारी करुनही राजापूर नगर परिषद प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहे . प्रशासन व ठेकेदार यांच्या या मनमानी कारभाराविरोधात नागरिकानी आता कोकण आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.












