
रत्नागिरीमध्ये २०२१ मध्ये आर्जू टेक्सोल नावाची कंपनी कार्यरत झाली. ज्यांनी कंपनी स्थापन केली आणि कंपनीचे ऑफीस गोडावुन चालू केले, त्यात कुठेही कंपनी चालविणे लोकांच हित आणि पैशाचा परतावा हा विषयच नव्हता. परंतु आपल्याकडे पैसे दामदुप्पट होतात या एकाच वाक्यावर कोणीही कशाही पद्धतीने विश्वास टाकून गुंतवणुक केली जाते आणि मग दामदुप्पट पैशाच्या हव्यासाने लोक फसवले जातात. कंपनीचे नाव बदलत, फसवणुक करणारे बदलतात परंतु फसणारे सर्वसाधारणपणे तेच असतात. फसवणुक करणाऱ्या कंपन्या असा काही लॉलीपॉप लोकांसमोर ठेवतात की त्यासाठी त्या कंपन्यांना कोणतीही जाहीरातबाजी करावी लागत नाही. आपोआपच माऊथ पब्लिसीटी होऊन अशा कंपन्यांच्या दारात फसवून घेणाऱ्यांची रांगच लागलेली असते. कोकणचाच विचार केलातर आजवर कोकणात गुंतवणुकीवर दामदुप्पट पैसे देतो असे सांगून कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. या कंपन्यांची नामावलीची यादी बनवली तर पंचवीस-तीस कंपन्या असतील तरीही लोकांना फसवणुकीचा हा फंडा आजच्या ‘ऑनलाईन’च्या जमान्यातही तसाच सुरू आहे. रत्नागिरीमध्ये आर्जू टेक्सोल कंपनीनेही खिळे बनवायचे त्यासाठीचा कच्चा माल पुरवणार, कच्च्या मालावर प्रक्रिया केलेल्या वस्तू परत कंपनी घेणार याचबरोबर १६ टक्के व्याजाने जी रोख गुंतवणूक कराल त्यावरही चांगला नफा देण्याचं आमिष दाखवलं. रत्नागिरीतील लोकांनी या आर्जू टेक्सोलमध्ये जसे करोडो रूपये गुंतवले तसे सिंधुदुर्गातीलही काहींनी यात गुंतवणुक केली आहे. पाच-पंचवीस हजारापासून पाच-पंचवीस लाख रूपयापर्यंतची ही गुंतवणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात सुरूवातीला आर्जू टेक्सोल कंपनीकडून फसवणूक झाली हे सांगायला कोणीही पुढे येईनात. पहिली पोलिसात तक्रार राजेश प्रभाकर पत्याने यांनी दिली. राजेश पत्याने यांच्या फसवणुकीच्या तक्रारीनंतर रत्नागिरी पोलिसांकडे फसवणूक झाल्याच्या तब्बल ८५१ तक्रारदारांनी तक्रारी दिल्या आहेत. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी तपासाची गती वाढवली. प्रसाद शशीकांत फडके, रा. गावरवडी-रत्नागिरी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केरकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव अशी रत्नागिरी पोलिसात गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी भागात या कंपनीचे ऑफीस थाटण्यात आल्याची चर्चा आहे. दुर्दैवाने नेहमीप्रमाणेच आर्जु टेक्सोल कंपनीच्या या खोट्या मायाजालात गोरगरीब सर्वसामान्यांनीही गुंतवणुक केली आहे. रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या आर्जु टेक्सोल कंपनीच्या बनवाबनवीचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे. त्याचबरोबर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि पोलिस पथक कार्यरत करण्यात आली आहेत. रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्गातही आर्जु टेक्सोलने कार्यालय उघडून फसवणुकीचा फंडा चालवला. आर्जु टेक्सोल कंपनीशी संबंधितांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या लोकांची फसवणुक करण्याचा प्लॅन करूनच लोकांना फसवलं आहे. दिल्ली नोयडाशी काही कनेक्शन आहे का? याचा तपासही झाला पाहिजे. लोकांसमोर भुलभुलैय्या निर्माण केल्यावर लोक फसतात. हे आता नेहमीचंच आहे. या आर्जु टेक्सोलच्या बाबतीतही वेगळं काही घडलेले नाही. या आर्जु टेक्सोलच्या कंपनी स्थापनेमागे केवळ लोकांची फसवणूक करून जेवढे पैसे जमविता येतील तेवढे पैसे जमवायचे सरळ-सरळ हाच उद्देश समोर ठेवून या आर्जु टेक्सोल कंपनीशी संबंधित असलेल्यांचा उद्देश स्पष्ट आहे. यापेक्षा वेगळा कोणताही उद्देश असू शकत नाही. खिळे तयार करणे, कच्चामाल, पक्का माल, वस्तू विक्री आणि त्यातून गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणुक करणाऱ्यांचा परतावा हे सारच भुलभुलैय्या पेक्षा वेगळ काहीच नाही. रत्नागिरीतील चौकडीने रचलेला हा अशी ही बनवाबनवीचा हा नाट्यप्रयोग आहे. बाकी नाही. आजवर ज्या कंपन्यांनी फसवणुक केली त्यांच पुढे काही होऊ शकल नाही. तरीही आपण मात्र कधीच या अशा घटनांतून शहाणपण शिकत नाही. दामदुप्पट पैसे मिळणार या हव्यासापोटी गुंतवणुक करत राहतो. फसल्यावर मग पोलिसात तक्रार दिली की पोलिस काही करत नाहीत म्हणून ओरड करायलाही आपणच मोकळे. यापूर्वीही अनेक मार्केटींग कंपन्यांनी फसवणुक केली आहे. यापुढच्या काळात तरी जनतेने सावध व्हायला हवे.











