लांजा नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा नमुना

गटारांसाठी खोदलेले चर ठरताहेत अपघातात कारणीभूत 

संतोष कोत्रे lलांजा -: जून महिन्याचा पहिला आठवडा संपून पावसाला सुरुवात तरीही लांजा शहरात ठिकठिकाणी गटारांची कामे अपूर्ण अवस्थेत असून गटारांसाठी खोदलेले चर अपघाताला निमंत्रण देत आहेत. यातून लांजा नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला असून एखादा अपघात होऊन कोणी जायबंदि झाल्या नंतरच लांजा नगरपंचायतीला जाग येणार का?असा सवाल आता नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

लांजा नगरपंचायतीमार्फत लांजा शहरात अनेक प्रभागातील गटारांची कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी दोन दोन महिन्यांपासून गटारे बांधण्यासाठी मोठमोठे चर खोदून ठेवलेले आहेत असे असले तरी या गटार बांधण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने सद्यस्थितीत हे गटारांसाठी खोदून ठेवलेले उंच चर अपघातात कारणीभूत ठरत आहेत .विशेष बाब म्हणजे पावसाळापूर्वी सर्व गटांरांची किंवा विकास कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र पावसाला सुरुवात झाली तरीही गटारांची कामे ही पूर्ण झालेली नाहीत.

गटारांसाठी खोदलेले मोठमोठे चर हे जणू अपघातांना निमंत्रण देत आहेत. मात्र नगर पंचायत प्रशासन किंवा नगरपंचायतचे अधिकारी, इंजिनियर यांचे याकडे दुर्लक्ष होते की काय असा सवाल यामुळे निर्माण होत आहे. एकूणच या नगरपंचायतीच्या या कारभाराबाबत विरोधी पक्ष देखील मुग गिळून गप्प असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गटारात एखादे वाहन पडून अपघात झाल्यानंतर नगरपंचायतीला जाग येणार का? आणि गटारे बांधण्याबाबत नगरपंचायत जाणीवपूर्वक लक्ष देणार का? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.