राजापूर (वार्ताहर): वीज कर्मचारी म्हणून काम करताना कोणीही अंधारात राहु नये यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे दिवसरात्र प्रयत्न सुरू असताना. सणासुदीला विज पुरवठयात व्यत्यय येवू नये म्हणून ते झटत असतात. अशावेळी एक गरीब महिला विजेअभावी जिवन जगत असल्याचे पाहून महावितरण उपविभाग राजापूर १ महावितरण कर्मचारी मनोहर सिताराम गिरी आणि श्री सौरभ राजेंद्र मयेकर या कर्मचाऱ्यांनी जुवे- जैतापूर येथील निराधार महिलेला स्वखर्चातून विज जोडणी देवून तिच्या आयुष्यातील अंध:कार दुर केला आहे. या दोन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सामाजिक औदार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
श्रीमती अंजली रमेश कांबळी असे या निराधार महिलेचे नाव आहे. या गेली अनेक वर्ष अंधारात होत्या. त्यांना या दोन कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून विज जोडणी विनामूल्य करून दिली. अनेकदा अर्ज विनंत्या करून नवीन विजजोडणीसाठी महावितरणचे उंबरटे झीजवावे लागत असल्याची उदाहरणे असताना या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून महावितरण कंपनीची प्रतिमा उंचावली आहे. त्याबद्दल त्यांचे जुवे – जैतापूर ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.










