धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी उमेश कुळकर्णी बिनविरोध

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालय कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यातून निवडून आलेल्या सदस्यांनी एकमुखाने पुन्हा एकदा उमेश कुळकर्णी यांच्याकडे अध्यक्षपद सुपुर्द केले. तसेच उपाध्यक्षपदी विलास पांचाळ आणि व चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी यांची पुन्हा निवड झाली.

संचालक म्हणून धामणसे गावाचे उपसरपंच अनंत जाधव, प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुळकर्णी यांची निवड झाली. श्री रत्नेश्वर ग्रंथालय हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड पंचक्रोशीमधील नावाजलेले शासनमान्य ब वर्गाचे ग्रंथालय आहे. संस्थेच्या घटनेनुसार या ग्रंथालयाचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू असून शालेय विद्यार्थी,महाविद्यालय विद्यार्थी व ग्रामस्थही या वाचनालयाचे सदस्य आहेत. ग्रंथालयाची पुस्तक संख्या, ग्रंथालयाची इमारत, ना नफा ना तोटा तत्वावर चालत असलेली दानशूर व्यक्तिमत्व (कै.) तात्या अभ्यंकर यांनी दिलेली रुग्णवाहिका, ग्रंथालयासाठी स्व. डी. के. जोशी यांच्या स्मरणार्थ बांधून देण्यात आलेला हॉल अशा ग्रंथालयाच्या गावासाठी उपयुक्त सेवासुविधांसाठी अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी योगदान दिले आहे. म्हणून सर्वानुमते अध्यक्ष उमेश कुळकर्णी, उपाध्यक्ष विलास पांचाळ व चिटणीस मुकुंद जोशी यांची पुन्हा निवड झाली.

श्री रत्नेश्वर ग्रंथालय नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात यशस्वी राहिले आहे. यापुढेही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, वाचन विषयक उपक्रम राबवून उत्तम वाचकांची संख्या वाढावी यासाठी काम करणार असल्याचे नवीन कार्यकारणीने सांगितले. सार्वजनिक ग्रंथालयांचे जिल्हास्तरीय अधिवेशन धामणसें येथे घेण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी या वेळी सांगितले.

या वेळी ग्रंथालयाचे ग्रंथपाल केशव कुळकर्णी यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, धामणसें गावाचे सरपंच अमर रहाटे व रत्नेश्वर देवस्थान अध्यक्ष शेखर देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष दिपक जाधव ,मुख्याध्यापक अविनाश जोशी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.