महाविकास आघाडीत हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसला मिळावेत
प्रदेश काँग्रेस व राष्ट्रीय कार्यकारणीकडे प्रस्ताव सादर
पक्षाने संधी दिल्यास राजापूरातुन निवडणूक लढविणार
स्थानिकच उमेदवार हवा अशी पक्षाच्या ज्येष्ठ व तरूणांची मागणी
राजापूर (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणूकीत राजापूर, लांजा-साखरपा व चिपळूण-संगमेश्वर हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडावेत असा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव पक्षाच्या वतीने प्रदेश काँग्रेस व राष्ट्रीय कार्यकारणीकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे. राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातुन यावेळी स्थानिकच उमेदवार हवा अशी सगळयांची मागणी असून पक्षाने संधी दिली तर आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही अॅड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
सोमवारी राजापुरात पत्रकार परिषद घेत अॅड. सौ. खलिफे यांनी आपली भूमिका मांडली. राज्यात महाविकास आघाडी असून् लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. राज्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. आता पक्षाकडून विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हयातील राजापूर, लांजा-साखरपा व चिपळूण-संगमेश्वर हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडावेत असा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. ही मागणी लक्षात घेऊन तसा प्रस्ताव पक्षाच्या राज्य व देशपातळीवरिल कार्यकारणीकडे पाठविण्यात आला आहे असेही अॅड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
राजापूर विधानसभा मतदार संघ हा पुर्वी पासून काँग्रेसकडे असलेला मतदार संघ आहे. राजापूर विधानसभा मतदार संघात लोकांना आता स्थानिक उमेदवार हवा आहे. बाहेरच्या लोकांना किती वर्षे आंम्ही सहन करायचे असा जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षाकडून संधी मिळाल्यास काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचेही अॅड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
यापुर्वी काँग्रेसकडून या मतदार संघात समाविष्ठ असलेल्या लांजा व संगमेश्वर भागातील उमेदवारांना काँग्रेसच्या वतीने संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता राजापूर तालुक्याला संधी मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व तरूण कार्यकर्ते यांनी घेतली आहे. याचा नक्कीच पक्ष विचार करेल असा विश्वासही अॅड. सौ. खलिफे यांनी व्यक्त केला आहे.
———————————————————–











