देवघर-सोंडे ग्रामपंचायतीकडून २५,८५० जुनाट वृक्षांची गणना

 

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील देवघर – सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे. ग्रामपंचायतीने पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच वृक्ष संवर्धनासाठी २५,८५० जुनाट वृक्षांची गणना करण्याची मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही राबवला. या पाठोपाठच माझी वसुंधरा अभियानांतर्गत पुरातन वृक्षांच्या संवधर्नासाठी संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश ग्रामस्थ जुनाट वृक्ष तोडून टाकतात. यामुळे पर्यावरणाचा हास होत असतो.

 

या पार्श्वभूमीवर जुनाट वृक्षांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. यासाठी गावातील जुनाट वृक्षांची गणना करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये १२६ वड, ४७ पिंपळ, ३५ चिंच, २५६४२ देशी जुनाट आंब्यांची गणना करण्यात आली. जुनाट वृक्ष ग्रामस्थांनी तोडू नयेत, यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. जुनाट वृक्षांचे संगोपण करण्यासह नव्याने वृक्ष लागवड करून जोपासना करण्याबाबतही ग्रामस्थांना सूचित केले जात आहे. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामविकास अधिकारी दीपक यादव यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या मोहिमेस ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने हे अभियान यशस्वी होत आहे.