आसगे दाभोळे मार्गावरील हिट अँन्ड रन प्रकरण
१६ टायर ट्रकच्या चालकाला सांगलीतून अटक
लांजा( प्रतिनिधी) लांजा आसगे दाभोळे मार्गावर आसगे येथे मोटरसायकलला धडक देऊन पसार झालेल्या या घटनेतील ट्रक चालकाला सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सांगली इथून अटक केली आहे. ही घटना दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता घडली होती.
लांजा तालुक्यातील गोविळ येथील शाम अर्जुन जाधव आणि प्रकाश बाबाजी जाधव हे दोघे २८ एप्रिल रोजी मोटारसायकलने तळवडे येथे जात असताना अज्ञात वाहनाने आसगे येथे दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला होता. या धडकेनंतर संबंधित वाहन चालक पसार झाला होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान लांजा पोलिसांसमोर निर्माण झाले होते. या हिट अँड रन प्रकरणाचा तपास करणे अवघड होते. विशेष बाब म्हणजे या रोडवर लांजा, आसगे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी देखील जनतेतून केली जात होती.
त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी लांजा कोर्ल फाटा, धुंदरे येथील लाकूड गिरण, आसगे येथील कोत्रे दुकान या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला होता. आसगे येथील चौधरी यांच्या हार्डवेअर दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये धडक देणारा १६ टायर ट्रक हा सदर घटना घडल्याच्या दरम्यानचा कालावधीत दिसून आला होता.ट्रक क्रमांक (एम एच ५० एन- ८१७२) याप्रकरणी लांजा पोलिसांनी सांगली येथून रुपेश सिद्धू वाघमारे (वय ३५, राहणार येळापूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली) याला ताब्यात घेतले होते. तपासा दरम्यान त्याने आपणच धडक दिल्याची कबुली दिली होती.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४/१७७, आणि भादवि कलम ३०४ अ, २७९, ३३७ ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपात पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे करत आहेत. लांजा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.










