इंदवटी बाईतवाडी येथील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, प्रशासनासमोर पेच
लांजा (प्रतिनिधी) सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवण शेत्रातील गावातील ग्रामस्थांना
महसूल प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १८० कुटुंबाना सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटीसा लांजा महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र इंदवटी बाईतवाडी येथील दोन कुटुंबांची तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी भेट देऊन व लोकांची मनधरणी केल्यानंतरही राहती जागा सोडण्यास व स्थलांतरास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे भुगर्भ शास्त्रज्ञांतर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत. अतिवृष्टी जोखीम भागात खोरनिनको साईनगर मुसळेवाडी येथील २५ घरे, वनगुळे ५ घरे, इंदवटी ९ घरे, खावडी भोवड वाडी १५ घरे, गोळवशी तेलीवाडी २० घरे, साटवली तालये वाडी, भांडार वाडी ३४,भांबेड दत्त मंदिर १,वेरवली पाथरे वाडी ११, कुरंग १३,निवसर मुस्लिम वाडी ४०,इदवंटी बाईत वाडी २,गांगरकर कोकण रेल्वे बोगद्या शेजारी ५, कोल्हे वाडी १ या ठिकाणी या कुटुंबाना सतर्कता आदेश देण्यात आले
खोरनिनको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे .दरडग्रस्त गावात पालक, अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी या अधिकारी यांनी गावातील यंत्रणा ,संस्था मंडळे यांच्या संपर्कात राहून यांच्या मदतीने आपत्ती कालीन वेळी अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.वनगुळे बौध्दवाडी येथे भूस्खलनचा धोका असल्याने येथील कुटूंब अतिवृष्टी वेळी समाज मंदिरात रात्रीच्या वेळी स्थलांतर होतात दरड ग्रस्त ठिकाणी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अतिजोखिम कुटुंबातील व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे
इंदवटी बाईतवाडी येथील २० घरांचे व २५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लांजा तहसीलदार यांनी भूवैज्ञानिक यांना दिल्या आहेत. तर इंदवटी बाईतवाडी येथील दोन कुटुंबियांनी स्थलांतरणास नकार दिला आहे.
दरम्यान महसूल प्रशासनाकडून लांजा तहसीलदार प्रमोद कदम आणि प्रांताधिकारी वैशाली माने यांनी
या ग्रामस्थांची भेट घेतली. बाईतवाडी या ठिकाणी वरच्या भागात मोठा दगड असून खालील बाजूला दोन घरे आहेत. अशा परिस्थितीत भूस्दुखलन झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच तुम्ही जागा सांगा आम्ही त्या जागेवर तुमचे पुनर्वसन करतो असे देखील तेथील ग्रामस्थांना सांगितले आहे. मात्र आमची ही पूर्वापार जागा आहे. आमची देवाची जागा आहे. आणि जागा सोडणार नाही असा पवित्रा येथील कुटुंबीयांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
एकीकडे दरडग्रस्त व भूस्खलन भागातील कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन पुढाकार व प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांनीच राहती जागा सोडून जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसाठी प्रयत्न करणाऱ्या तहसीलदार प्रमोद कदम आणि महसूल प्रशासन यांच्यासमोर काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, लांजा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे .लांजा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तहसीलदार प्रमोद कदम यांनी शासकीय यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.











