साडेसात लाखांचे दागिने लांबविणाऱ्या रत्नागिरीतील एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी । प्रतिनिधी : घरातील अडचण दुर करतो असे सांगून भोंदु बाबा करवी भाउ-बहिणीची फसवणूक करत तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही फसवणूक 2 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4 ते 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5.30 वा. कालावधीत कुवारबाव येथे करण्यात आली आहे.
सुभाष बाबासाहेब सुर्वे (रा.विश्वशांती संकुल नाचणे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रसाद शंकर मराठे (42, रा.बिल्वमंगल सोसायटी कुवारबाव,रत्नागिरी) यांनी अडीच महिन्यांनंतर मंगळवार 18 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित सुभाष सुर्वे याने प्रसाद मराठे आणि त्यांच्या बहिणीला मी तुमच्या घरातील अडचणी माझ्या ओळखीच्या बाबांमार्फत दूर करतो असे सांगितले. त्या करता देवापुढे आकार देण्यासाठी तुमचे दागिने लागतील असेही त्यांना सांगितले.
या दोघांचा विश्वास संपादन करुन त्याने प्रसाद मराठेंच्या बहिणीचे दागिने घेउन ते काम झाल्यानंतर परत आणून देतो असे सांगून वेळोवेळी असे एकूण 7 लाख 50 हजारांचे दागिने घेउन गेला. परंतू काही महिन्यांचा कालावधी होउन गेल्यानंतरही त्याने दागिने परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










