रत्नागिरी : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात भात व नाचणी या पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ १ रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात भात व नाचणी पिकांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसानीपोटी भरपाई मिळणार आहे.
या योजनेचा विमा हप्ता १५ जुलै पर्यंत आपले सरकार सेवा केंद्र, बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे.










