फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रावरही वाण उपलब्ध, लाभ घेण्याचे डॉ.विजय शेट्ये यांचे आवाहन
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : ‘रत्नागिरी-८’ ही एक क्रांतिकारक भात जात असुन कोकण कृषी विद्यापीठ – दापोली अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथे विकसित केली गेली. सन २०१९ मध्ये अधीघोषित झालेली रत्नागिरी- ८ ही भाताची जात कोकणामध्ये विशेष लोकप्रिय आणि शेतकऱ्यांच्या आवडीची होताना दिसत आहे. या जातीची मागणी कोकणातील पाचही जिल्ह्यातून वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘ सुवर्णा’ या जातीला पर्याय म्हणून विद्यापीठाने ही जात विकसित केली. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५ ते १४० दिवसात तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली तर अखंड तांदूळ जास्त होऊन तांदूळ तुटीचे प्रमाण खूपच कमी येते. मध्यम उंचीची असल्यामुळे लोळत नाही. करपा किंवा कडा करपा रोगास प्रतिबंधक असून वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडीला कमी बळी पडते. आजकालच्या बदलत्या हवामानामुळे योग्य असणारी ही जात आहे. कारण कालावधी १३०ते १४० दिवसाचा असल्याने उशिरा पडणाऱ्या (गणपती उत्सवामध्ये) भात पावसाचा फटका बसताना दिसून येत नाही.गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा अनुभव खूप चांगला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या बियाण्याची लागवड करण्यात आली होती.गेल्या खरीप २०२२ या हंगामामध्ये या जातीचे ३५ टन बियाणे या दोन जिल्ह्यांमध्ये– रत्नागिरी व फोंडाघाट या दोन केंद्रावरून विक्री करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्यांनी ही जात चांगली असल्याचे नमूद केले आहे. ही जात फक्त कोकणापूर्ती न राहता सहा राज्यांमध्ये उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश,तेलंगणा या राज्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून शिफारस केली गेलेली जात आहे. या जातीची लोकप्रियता पाहून देशातील काही खाजगी कंपन्यांनी विद्यापीठाशी करार केला आहे. या कराराअंतर्गत रत्नागिरी-८ या भात जातीचे बियाणे मोठ्या प्रमाणावर तयार करून इतर राज्यांमध्ये विक्री करत आहेत.
” रत्नागिरी – आठ” ही मध्यम बारीक जाण्याची जात असून १००० दाण्यांचे वजन १६ ते १७ ग्रॅम एवढे आहे. या जातीचे विद्यापीठ स्तरावर सरासरी उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल प्रति हेक्टर एवढे असले, तरी सिंधुदुर्ग– रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ८५ ते ९० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे उत्पन्न घेतलेले आहे. तसेच इतर जातीपेक्षा रत्नागिरी-आठ या भात जातीवर करप्याचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे गेली दोन वर्षे बियाण्याची मागणी वाढत आहे हे लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाने कृषी संशोधन केंद्र, शिरगाव, जिल्हा- रत्नागिरी आणि कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोठ्या प्रमाणावर बियाणे निर्माण केले आहे. कोकणाला पुरेल एवढे बियाणे निर्माण झालेले नाही, याची आम्हाला पूर्ण माहिती असूनही प्रथम आलेल्या प्राधान्य देऊन, बियाण्याची विक्री करण्यात येणार आहे. तरी खालील कार्यालयाशी संपर्क साधून बियाण्याची मागणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. बियाण्याची मागणी आपल्या तालुक्यातील शेतकरी संघामध्ये करावी किंवा खालील दिलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन, किंवा फोन द्वारे संपर्क करून माहिती घेऊ शकता आणि बियाणे खरेदी करू शकता.संपर्क — डॉ. विजय विष्णू दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी मो.९४२३८०६४८६..अथवा डॉ. विजय शेट्ये,प्रभारी अधिकारी,कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मो.–७४९९५७३४३७/९४२१३४३५६२.. शेतकऱ्यांनी आपली मागणी तातडीने नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे..