धुरीवाडा कुरण किनारपट्टीची निलेश राणेंनी केली पाहणी

Google search engine
Google search engine

 

बंधारा प्रश्न सोडवलात आता खाडी पात्रातील गाळ प्रश्नही सोडावा ; स्थानिक नागरिकांची निलेश राणेंकडे मागणी

मालवण | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण नगरपरिषद हद्दीतील धुरीवाडा जामसंडेकर घर ते कुरण पर्यंत खाडीकिनारी बंधारा कम रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यासाठी पाच कोटींचा निधी प्राप्त असून भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बंधाऱ्याच्या कामाबाबत त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली.

यावेळी पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून कोळंब खाडीतील गाळ काढण्याची मागणी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून केली. याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे.

धुरीवाडा खाडी किनारी गाळ काढण्याची तसेच बंधारा ही मागणी स्थानिक नागरिकांकडून अनेक वर्षापासून करण्यात येत होती. यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून २०२३- २४ च्या अर्थासंकल्पात या कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. निलेश राणे यांच्या माध्यमातूनही यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मागील महिन्यात निधी मंजूर झाला.

मंगळवारी भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी याठिकाणी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. यावेळी भाजपा नेते प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, वसंत गावकर, विशाल गोवेकर, शंकर शिरसेकर, चेतक पराडकर व श्रीकृष्ण मंदिर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कोळंब खाडीत साचलेल्या गाळाच्या समस्येकडे ग्रामस्थांनी राणे यांचे लक्ष वेधले. येथील गाळ काढल्यास पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले असता याबाबत रितसर निवेदन सादर करण्याची सूचना करून या कामासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.