पावसाळ्यात घाट घालतोय पर्यटकांना साद , पर्यटकांची पावले रघुवीवर घाटाकडे
देवेंद्र जाधव (खेड) निरव शांतता… सह्याद्रीच्या अभेद्य कडेकपारीतून फेसाळणारे जलप्रपात… थंड वातावरण… अन सोबतीला मुसळधार पाऊस अन दाट धुके याने वेढलेल्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटाने हिरवा शालू पांघरला असून या निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी जणू सादच घालत असुन पावसामुळे या घाटात निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी व चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावले रघुवीर घाटाकडे वळू लागली आहेत.
खेड तालुक्यापासून खोपी येथे सुमारे ३२ किमी अंतरावर असलेला रघुवीर घाट पावसाळयातील पर्यटकांचे एक नवे ‘डेस्टिनेशन’ ठरत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या घाटाचे महत्त्व पावसाळा या ऋतूतच वाढत असल्याने पर्यटकांची पावले आपसुकच या घाटाकडे वळताना दिसतात. शिंदी व सातारा या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट म्हणजे दळणवळणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ७६० मिटर उंच तर लांबी १४ किमी आहे. या घाटात पावसाळयात तर जणू स्वर्गच उतरल्याचा अनुभव अनेकांना येतो. निसर्गाचा अविष्कार असलेल्या या घाटाला दरडी कोसळण्याचा जरी शाप असला तरी पावसाळयात या घाटातील निसर्ग पाहण्यासारखेच असते.
दाट धुक्यांमुळे डोंगर माथ्यावर उतरलेले ढग, कड्या कपारीतून वाहणारे लहान मोठे धबधबे हे पर्यटकांना जणू काही आव्हानच देत असतात.
कोसळणाऱ्या जलधारा कवेत घेत चिंब-चिंब भिजण्याचा आनंद देणारा तसेच सौंदर्यमयी अविष्काराने नटलेला रघुवीर घाट पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा दुवाच ठरत असून पावसाच्या सरीवर सरी कोसळताच आपसुकच पर्यटकांची पावले घाटाकडे वळत आहेत.
एका बाजूला खोल दऱ्या अन् दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगामध्ये फेसाळत कोसळणारे २७ हून अधिक धबधब्यांबरोबरच दाट धुके अन् निरव शांततेची पर्यटकांवर मोहिनीच पडते. त्यामुळे या घाटाचे ‘गारुड’ आजही पर्यटकांच्या मना मनावर कायम आहे.
धुक्यात लपेटणारं अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या या रघुवीर घाटातील खोल दरीचा कानोसा घेतला तर हजारो फूट उंची वरुन खाली पडल्यासारखे वाटते. उंच अन् अभ्यद्य कड्यांकडे पाहिले तर छातीचे ठोकेच चुकतात. त्यामुळे डोंगरमाथ्यावरुन व कड्याकपाऱ्यामधून लहान-मोठे व मन तेवढेच उल्हासित करणारे फेसाळत कोसळणारे नैसर्गिक धबधबे पर्यटकांना मोहिनीच घालत आहेत. कांदोटी खोऱ्यातील शिंदी, वळवण , उचाट, चकदेव, बन, निवळी, वाघावळे, म्हाळुंगे, सालोशी, कांदाट, अकल्पे, मोरणी आदी १४ गावे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात जोडली असली तरी रघुवीर घाटच दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे हा घाट पावसाळयात निसर्गाचे वेगळेच लेणं घेवून पर्यटकांच्या स्वागतासाठी उभाच असतो.
नैसर्गिक दृष्ट्या या घाटाची निर्मिती सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला तासून त्यामध्ये मानवी मेंदूने या घाटाची निर्मिती केली आहे. मुळातच समुद्र सपाटी पासून हजारो मिटर उंचीवर असल्यामुळे पावसाचे सर्वाधिक प्रमाण या घाटातच होत असल्याने बहुतांशी हा घाट धुक्याची दुलई पांघरुनच असल्याचा भास होतो. १४ गावातील नागरीकांना जोडणारा रघुवीर घाट हा सर्वसामान्यांची मने जोडणारा एक महत्वाचा दुवाच आहे. परंतु मुसळधार होणाºया पावसात या घाटात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने घाटात वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्याचा जीव तसा टांगणीलाच लागलेला असतो.
सद्या या घाटात मुसळधार पावसामुळे कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाच्या संततधारेने धबधबेही प्रवाहीत झाल्याने पर्यटकांची पावले आता घाटाकडे वळू लागली आहेत असे जरी असले तरी घाटात दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे











