मोरी खचून भगदाड पडलेल्या खोरनिनको रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी

 

बांधकाम विभागाकडून तातडीने भगदाड मुजवून रस्ता वाहतुकीस खुला

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील खोरनिनको मार्गावरील लक्ष्मी मंदिर ते चौगुले दुकान दरम्यान रस्त्यावर पडलेले भलेमोठे भगदाड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुजवून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मात्र घाईगडबडीत करण्यात आलेली ही तात्पुरती मलमपट्टी असून यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 

तालुक्यातील लांजा खोरनिनको मार्गावरील लक्ष्मी मंदिर ते चौगुले दुकान यादरम्यान वहाळावर
असलेली मोरी ही काल शुक्रवारी पडलेल्या प्रचंड पावसात दुपारी दीडच्या सुमारास खचली होती आणि या मोरीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते. त्यानंतर त्या रस्त्यावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. एसटीसह सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडून गेल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी धाव घेत या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करून भगदाड रुजविण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्ववत झाली आहे.
मात्र असे असले तरी भविष्यात पुन्हा या ठिकाणी रस्ता खचून वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा या ठिकाणी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.