‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची मालवण शहरात प्रभावी अंमलबजावणी करणार

 

भाजपा महिला शहाराध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांची माहिती

अमित खोत | मालवण : भाजपा महायुती महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर केल्या आहेत. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या माध्यमातून 21 ते 61 वयोगटातील पात्र महिलांसाठी दर महा दीड हजार रुपये खात्यात जमा केले जाणार असून या योजनेचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. प्रशासन स्तरावर नाव नोंदणी तसेच ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्या यंत्रणांना तसेच सर्व महिला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. अशी माहिती भाजपा मालवण शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांनी दिली.

 

 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचेही आचरेकर यांनी आभार मानले आहेत. हे सर्वसामान्य जनतेला न्याय हक्क देणारे सरकार असल्याचे आचरेकर यांनी सांगितले.