चिपळूण पोलीस ठाण्यात निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी!
चिपळूण (प्रतिनिधी):– लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान रायबरेलीचे काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूविरोधी वक्तव्य केले असून याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
या निवेदनानुसार भारतात राहणाऱ्या सर्व हिंदूंना राहुल गांधी यांनी हिंसक म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात स्वतःला जानवेधारी हिंदू म्हणून घेणारी व्यक्ती सर्वसमावेशक, सहिष्णू अशा हिंदूंना हिंसक म्हणण्याचा धादांत खोटारडेपणा करत आहे. स्वतःला अभिमानाने हिंदू म्हणवणाऱ्या हिंदूंना त्यांनी हिंसक आणि खोटारडे म्हटले आहे. हे सर्व त्यांनी वर्तमान संसद अधिवेशनात विरोधी पक्षनेते म्हणून बोलताना म्हटले आहे.
यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेतच पण हिंदू धर्माला व संस्कृतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची त्यांची मानसिकता यातून त्यांनी प्रकट केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची आमची तक्रार असल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
आम्ही हिंदू धर्माभिमानी “अहिंसा परमो धर्माः” यावर श्रद्धा ठेवणारे तर आहोतच पण “वसुधैव कुटुंबकम” अर्थात सर्व पृथ्वी एक कुटुंब आहे यावर श्रद्धा असणारे आहोत. अशा हिंदू समाजाला अपमानित व बदनाम करण्याच्या त्यांच्या या प्रवृत्तीला आळा घातला गेलाच पाहिजे. त्यामुळेच भारतीय न्याय संहितेनुसार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल अशा कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे जिल्हा मंत्री उदय चितळे, शहर मंत्री साईनाथ कपडेकर, श्री. पुरोहित भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, सारिका भावे, अश्विनी वरवडेकर, भाजप चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, महेश कांबळी, नाना काळे, निहार कोवळे, संदीप खरे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष शितल रानडे आदी उपस्थित होते.











