खेड(प्रतिनिधी) भरणे येथील नव्या जगबुडीपुलावरील उखडलेल्या मध्यभागाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. १७ दिवसांचा कालावधी लोटूनही अजूनही दुरूस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशांना धावणारी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणाहून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांचा वेगही मंदावला आहे. तीन दिवसात दुरूस्तीचे देण्यात आलेले आश्वासन हवेत विरले आहे.
२२ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जगबुडी पुलावरील एक मार्गिका मध्यभागीच उखडल्याने प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. दोन्ही माार्गावरील वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग खात्याने दिवसातच उखडलेल्या मध्यभागाची दुरूस्ती करून वाहतुकीसाठी पूल खुला करण्याचे संकेत दिले होते. उखडलेल्या मध्यभागी सळ्या टाकून मजबुतीसाठी त्यावर सिमेंट टाकण्यात येणार आहे. आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दुरूस्ती कामात अडथळा आल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीअंशी उसंत घेतली आहे. तरीदेखील दुरूस्तीचे संथगतीने काम सुरू असल्याने पुलावरील वाहतूक खुली होण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. एकाच मार्गिकेवरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांची धोकाही कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रसंगी फसगत होत असून अपघातांचा खात्याने ही बाब गांभीर्याने घेवून दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.










