वाटूळ येथील “सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” लवकरच मार्गी लागणार

रविवारी पालकमंत्री उदय सामंत करणार जागेची पहाणी

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील वाटूळ येथील प्रस्तावित शासकिय जागेवर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी निधी मंजूर होवून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू व्हावी अशी मागणी या हॉस्पीटलसाठी पाठपुरावा करणाऱ्या पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन समितीच्या वतीने सामंत यांना देण्यात आले आहे. पालकमंत्री सामंत हे रविवारी प्रत्यक्ष जागेची पहाणी करणार आहेत. त्यामुळे या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

 

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाची आरोग्य विषयी परिपूर्ण अशी सेवा नसल्याने पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईने गेले सात आठ वर्षे दोन्ही जिल्ह्याचे मध्य ठिकाण राजापूर तालुका असुन या ठिकाणी शासनाचे सुपर मल्टी स्पेशालीटी रुग्णालय व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करुन प्रयत्न केले. त्यानुसार राजापूर वाटुळ येथील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची पाहणी केली. ती जागा आरोग्य विभागास देण्यात यावी यासाठी समितीने प्रयत्न करून ती जागा सप्टेंबर २०२१ मधे बांधकाम विभागाने आरोग्य विभागास वर्ग करण्यात आली आहे.

 

सदर जागेवर लवकरच सुपर मल्टी स्पेशालीटी रुग्णालयाला निधी मंजूर होऊन त्वरित कामकाज सुरु होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच विधान भवन येथे पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबई चे शिष्टमंडळ यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण सामंत उपस्थित होते .
यावेळी सुपर मल्टी स्पेशालीटी रुग्णालया बाबत आजच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या ऐतिहासिक विषयी निर्णय याच अधिवेशनात घेण्यात येईल असे पालकमंत्री श्री. सामंत यांनी आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर ज्या जागी ओणी वाटूळ येथे सुपर मल्टी स्पेशालीटी रुग्णालय होणार आहे त्या जागेची स्वतः पालकमंत्री सामंत यांनी रविवार प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगितले.
या भेटीवेळी पंचक्रोशी ग्राम विकास समिती राजापूर मुंबई चे सचिव विश्वास राघव, प्रशासकीय समिती प्रमुख आणि अदिनाथ कपाळे, सहसचिव रुपेश चौगुले , सदस्य यशवंत जड्यार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.