टर्की पदार्थ बाळगणाऱ्या तीन पैकी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रत्नागिरी । प्रतिनिधी : शहरातील नाईक हायस्कुलकडे जाणार्या रस्त्यावर आपल्या ताब्यात 16 हजार 800 रुपये किंमतीचा टर्की (ब्राउन हेरॉईन सद़ृश्य) अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्या तीन पैकी दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवार 4 जुलै रोजी सायंकाळी 7.55 वा. करण्यात आली.
सोहेब शकील सोलकर (30,रा.राजीवडा,रत्नागिरी), आकिब काझी (रा.गवळीवाडा,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर फैसल मकसूद (रा.कर्ला,रत्नागिरी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत प्रभाकर बोरकर यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, गुरुवार 4 जुलै रोजी प्रशांत बोरकर हे पोलिस स्टॉफसह पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सायंकाळी 7.55 वा. सुमारास नाईक हायस्कुलकडे जाणार्या रस्त्यावर सोहेब सोलकर हा आपल्या ताब्यात 16 हजार 800 रुपयांचा 5 ग्रॅम वजनाचा टर्की हा अमली पदार्थ आपल्या ताब्यात बाळगून होता. तर आकिब काझी करवी त्याने तो विक्रीसाठी आणला होता. आणि फैसल मकसूदनेही त्यांना या गुन्ह्यात मदत केल्याने त्याच्याविरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 16 हजार 800 रुपयांचा अमली पदार्थ, रोख 5 हजार 800 रुपये आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 27 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.










