माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जनजागृती करण्यात आली.
एकदा निघालेल्या शासन निर्णयानंतर,शुद्धीपत्रक निघाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.शिवाय कागद पत्रांची जमवाजमव करण्यासाठी सगळ्या शासकीय कार्यालयासमोर रांगा लागल्या होत्या.महिला लाभार्थींच्या शंका,अडचणी दूर करण्यासाठी व जास्तीत जास्त या योजनेचा गावातील महिलांना लाभ मिळण्यासाठी आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मेळावा घेऊन जनजागृती करण्यात आली.या मेळाव्याला शेकडो महिला उपस्थित होत्या.सरपंच शेखर उकार्डे यांनी या योजनेची अंमलबजावणी सुयोग्य व्हावी या दृष्टिकोनातून उपस्थित महिलांना माहिती दिली.शंकाचे निरसन केले.शासनातर्फे मिळालेल्या मुदत वाढीचा उल्लेख करत,घाई गर्दी न करता कागदपत्रांची पूर्तता करूया असे आवाहन केले.संगमेश्वर तालुक्यात शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यात आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचा अग्रक्रमांक आहे.
ही देखील योजना राबवताना निकष पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी आंबव पोंक्षे ग्रामपंचायत प्रयत्न करेल असा विश्वास दिला.यावेळी उपसरपंच मंगेश मांडवकर माजी सरपंच व विद्यमान ग्रा.सदस्य सौ प्रिया सुवरे,मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर,सौ कुडतडकर,सौ पूर्वा भुवड,आदिंसह आशासेविका,अंगणवाडी सेविका,व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.











