मसूरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे येथील जयवंत जयराम घाडीगावकर यांच्या घरालगतचा गणपती कारखाना अतिवृष्टीमुळे कोसळून सुमारे अडीज लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. रविवारी दिवसभर धो धो बरसणाऱ्या पावसामुळे सदर गणपती कारखान्याचे नुकसान झाले आहे.
या कारखान्यात उभी असलेली मोटरसायकल, गणपती मूर्ती, गणपती बनवण्याचे पाट, इलेक्ट्रिक पंप, कॉम्प्रेसर, कलर मटेरियल, फायबर मूर्ती, गणपती बनवण्याचे इतर साहित्य असे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा गोळवण तलाठी यांनी केला. सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी जयवंत घाडीगावकर यांनी केली आहे.












