चिपळूणात गाळ काढल्याचा ‘शून्य’ उपयोग

 

लियाकत शाह यांचा गंभीर आरोप, पूररेषेच्या आतील भराव न हटवल्यास आंदोलन

चिपळूण : सुमारे १० कोटीहून अधिकचा निधी गाळ उपशावर खर्च केला. मात्र उपसलेला गाळ भरावासाठी आणि शहरातील तळी बूजवण्यासाठी केला गेला. इमारती, बंगले उभारण्यासाठी जागोजागी केलेल्या भरावामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. केवळ साडेतीन तास पडलेल्या पावसानंतर शहरात रविवारी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या बांधकामधारकांना प्रशासनाने वेळीच आवर घातला नाही किंवा चुकीच्या दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द न केल्यास चिपळूण कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

गेले दोन दिवस येथे मुसळधार पाऊस सुरू असून रविवारी सायंकाळी शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही तासाच्या पावसाने ही परिस्थिती निर्माण झाल्याने शाह यांनी शहरात जागोजागी केलेल्या भरावाला आक्षेप घेतला आहे. त्याबाबत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांना सोमवारी निवेदन सादर केले आहे. याविषयी शाह यांनी माहिती देताना सांगितले की, चिपळूण शहराची रचना बशीच्या आकाराची आहे. त्यामुळे चिपळूण हद्दीतील गाळ काढल्यानंतर पाणी साचून राहते. त्यासाठी धामणदिवीपासून गाळ काढण्याची गरज आहे. परंतू तेथे गाळ न काढता बाजारपेठेत हद्दीतील गाळ काढून तो शहरहद्दीत टाकल्याने त्याचा उलटा परिणाम होऊ लागला आहे. अनेक इमारती व बंगले उभारण्यासाठी भराव स्वरूपात गाळाचा वापर केला गेला. यातून शहरातील जागोजागी असलेले पुर्वीचे तलाव व शेती बुजवून तेथे भराव आणि पत्र्याच्या शेड उभारल्या जात आहेत. शिवनदी किनाऱ्यावर जागोजागी पत्रा शेड उभारलेल्या दिसतात. याचपद्धतीने जुना कालभैरव मंदिरालगतच्या भागात पुर्वी शेती केली जायची. त्यामुळे या परिसरातील पाणी लगतच्या नाल्यातून वाशिष्ठी नदीला वाहून जात होते. मात्र आता तेच पाणी नव्याने केलेल्या भरावामुळे आईस फॅक्टरीच्या ठिकाणी अडून राहते. चिंचनाका येथेही केलेल्या भरावाचा फटका बसू लागला आहे. शहरातील अनेक ठिकाणी नव्याने भराव केले असून त्या-त्या भागातील लोकवस्तीला त्याचा फटका बसू लागला आहे.

मुळातच २००५ व २०२१ च्या महापुराची नोंद घेवून प्रशासनाने शहरातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी योग्य ते नियोजन व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कठोर नियमावली ठरवायला हवी होती. परंतू त्याउलट शहरात प्रत्येक ठिकाणी उंच भराव करण्यास बेजबाबदारपणे परवानगी व नाहरकत दाखले देण्यात आले. त्यातून शहरातील नागरिकांना एकप्रकारे महापुराच्या खाईत लोटल्या सारखेच आहे. २००५ च्या महापुरानंतर शहरात नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती कामास ओपन पार्किंग शिवाय परवानगी न देण्याचा ठराव आमच्या कारकिर्दीत झाला आहे. त्या ठरावाची जराही अमलबजावणी होताना दिसत नाही. प्रशासन त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असेल अथवा त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला जात असेल, तर ते जनतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारात सूधारणा न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन चिपळूण तालुका कॉंग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असाही शाह यांनी इशारा दिला. तसेच गाळ नियोजनबद्ध काढायला हवा. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून शासनानेही केवळ हवेत आकडे न सोडता गाळ उपसा व वाहून नेण्यासाठी पुरेसा निधी द्यावा, अशी मागणीही करणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.