सार्वजनिक बांधकामच्या बजेटमध्ये ७० कोटी रुपयांची तरतुद
माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली घाटाला पर्यायी मार्ग म्हणून गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या केसरी फणसवडे या सव्वा नऊ किलोमीटर लांबीच्या मार्गाला अखेर मंजूरी मिळाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधीमंडळात सार्वजनिक बांधकामच्या बजेटमध्ये यासाठी तब्बल ७० कोटी रुपयाची तरतुद केली आहे. यामुळे आंबोली घाटाला सुरक्षित आणि सक्षम असा पर्यायी मार्ग निर्माण होणार असल्याची माहीती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, भास्कर गावडे आदी उपस्थित होते.
आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने तसेच घाटातील मोऱ्याही कमकुवत झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग म्हणून फणसवडे नेनेवाडी चौकुळ या मार्गाची मागणी होत होती. परंतु यासाठी आवश्यक ती निधीची तरतूद होत नसल्याने हा पर्यायी मार्ग विकास पथावर आलेला नव्हता. मात्र, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने कोकणाला पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम मंत्री लाभल्याने लोकांची असलेली मागणी आता पूर्णत्वास येणार आहे.
मंगळवारी विधिमंडळात सार्वजनिक .बांधकाम विभागाच्या बजेटमध्ये मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तब्बल सव्वा नऊ किलोमीटरच्या या मार्गाला मंजूर देताना तब्बल ६० कोटी रुपये तरतुद जाहिर केली. या मार्गामध्ये वनविभागाची येणारी खाजगी जमीन लक्षात घेता त्याच्या भूसंपादनासाठी व इतर गोष्टीसाठी वेगळ्या दहा कोटीची तरतूदही केली असून एकूण ७० कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. लवकरच या प्रमुख जिल्हामार्गाचे भूमीपूजन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आंबोली घाटातून जाताना ज्या प्रकारचे निसर्गसौंदर्य न्याहळता येते त्याच प्रकारचे निसर्ग पर्यटन नव्याने होणाऱ्या या पर्यायी मार्गातही पाहायला मिळणार आहे. तसेच या मार्गामुळे सुमारे पाच ते सहा किलोमीटरचे अंतर यामुळे वाचणार असून वेळेचीही बचत होणार आहे. तसेच सक्षम आणि सुरक्षित असा हा मार्ग असणार आहे. फणसवडे नेनेवाडी चौकूळ व आंबोली असा हा मार्ग असणार आहे. एकूणच या मार्गाचे शिल्पकार हे रवींद्र चव्हाणच असून भविष्यातही जिल्ह्याला मोठा निधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
आंबोली घाट मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून गेले कित्येक वर्ष केसरी फणसवडे चौकुळ या मार्गाची मागणी केली जात होती अनेक लोकप्रतिनिधी राजकीय नेते यांनीही याबाबत आवाज उठवला होता. आंबोली घाटमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने या मार्गाची मागणी जोर धरत होती. परंतु अपेक्षित असे काही घडत नसताना मंगळवारी विधिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे बजेट मांडताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या मार्गाला मंजुरी दिल्याने एक प्रकारे आंबोली घाटमार्गाला सक्षम असा पर्याय निर्माण होणार आहे. एकूणच या निर्णयाचे जनतेतूनही समाधान व्यक्त होत आहे, असेही संदीप गावडे यांनी सांगितले.












