इंटरनेट अभावी अंगणवाडी सेविकांसमोर प्रश्न
संतोष कोत्रे | लांजा ;- लांजा शहर शहरासह तालुक्यात इंटरनेट सेवेची बोंब असताना लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरायचे कसे? असा यक्षप्रश्न सध्या अंगणवाडी सेविकांसमोर निर्माण झाला आहे
राज्य शासनाने वार्षिक अडीच लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत या योजनेचे फॉर्म भरण्याची मुदत आहे.सध्या या योजनेची पूर्तता करण्यासाठी लागणार्या कागदपत्रांसाठी तालुक्याच्या गावागावातील महिलांमध्ये प्रचंड धावपळ उडाली आहे. आधार केंद्र व बँका व अन्य सर्वच ठिकाणी या महिलांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे. आपला काम धंदा सोडून महिलावर्ग आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि बँकांमध्ये रांगेने पासबुक काढण्यासाठी गर्दी करत आहेत.
लाडकी बहिण योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी ही शासनाने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे. असे असले तरी शहरासह तालुक्यातील इंटरनेट सेवा ही बहुतांशीवेळी कोलमडलेली असते किंवा फास्ट नेटवर्क मिळत नाही.
विशेषता लांजा तालुक्यातील बहुतांशी गावे ही ग्रामीण भागात असून या ठिकाणी या इंटरनेट सेवेचा पूरता बोजवारा उडालेला दिसतो. यामध्ये बीएसएनएलची सेवा बहुसंख्यवेळा खंडित असते आणि चालू असताना तिथे इंटरनेट स्पीड मिळत नाही अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने दिलेल्या लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकांसमोर मोठी अडचण निर्माण होत आहे. एक एक फॉर्म भरण्यासाठी बराच कालावधी जात आहे. त्यामुळे हे ऑनलाईन फॉर्म भरायचे कसे? असा प्रश्न या अंगणवाडी सेवकांसमोर निर्माण झाला आहे. फास्ट इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी. या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना फास्ट इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने
व्यवस्था करावी अशी मागणी देखील अंगणवाडी सेविकांतून केली जात आहे.










