रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समार्फत २० सोलर स्ट्रीट लाईटची व्यवस्था
चिपळूण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स यांच्या सहकार्याने चिपळूण तालुक्यातील कळंबट-फणसवाडी येथे २० सोलर स्ट्रीट लाईट बसवण्यात आले. या व्यवस्थेमुळे आता फणसवाडी ‘प्रकाशमान’ झाली आहे. कोकणातील अनेक गावे दुर्गम भागात वसलेल्या आहेत. येथे कायम विजेचा लंपडाव सुरू असतो. रस्त्यांवर विजेची व्यवस्था नसल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचीही शक्यता असते. याशिवाय अंधारात सर्प, विंचू दंश अशा घटनाही घडत असल्याने भीतीने गावकरी अस्वस्थ असतात. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी ही अडचण – लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ – मुंबई बाद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सचे -माजी अध्यक्ष डॉ. सचिन शिगवण (द सोलर मॅन ऑफ इंडिया) यांनी – त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ कळंबट फणसवाडी येथे २० सोलर स्ट्रीटलाईट बसवून दिले आहेत.
गावकऱ्यांनी तसेच त्यांच्या शिव कृपा विकास मंडळ फणसवाडीने हा उपक्रम वाडीमध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी सहकार्य केले आहे. वाडीतील विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या जीवनात सुरक्षितता आणण्यासाठी सोलर स्ट्रीट लाईट्स हा एक महत्त्वाचा उपाय ठरला आहे. सोलर स्ट्रीट लाईट्समुळे शाळकरी मुलांना रात्रीच्या वेळेसखेळणे आणि अभ्यास करणे सोपे झाले आहे. महिलांना रात्रीच्या वेळेस घरा बाहेर पडताना आता सुरक्षित वाटू लागले आहे. दि. ७ जुलै रोजी या सोलर स्ट्रीट लाईटचे उद्घाटन करण्यात आले.
. यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्सच्या अध्यक्ष शनोबर मुरली, सचिव सुयोग गंगावणे, माजी अध्यक्ष राज शेठ, डॉ. सचिन शिगवण, माजी अध्यक्ष राजामोहन, श्रीमती द्रुपदा शिगवण, मोहित वैद्य, निशांत पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत, शिव कृपा विकास मंडळ फणसवाडी अध्यक्ष आणि सदस्य, महिला व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. येणाऱ्या काळात असे अनेक नवीन प्रकल्प जि. प. शाळा तसेच गावासाठी राबवण्याचा मानस यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.












