नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज सायंकाळी होणार संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या नुतन अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सचिवपदी सचिन रावराणे आणि खजिनदारपदी श्रीया धावले यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज सायंकाळी 7 वा. आनंदीबाई रावराणे महाविद्याल येथे संपन्न होणार आहे.
वैभववाडी येथील हॉटेल वैभव येथे रोटरी क्लब ची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी मावळते अध्यक्ष संजय
रावराणे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गुळेकर, चार्ड्स प्रेसिडेंट संतोष टक्के, सचिन रावराणे, श्रीया धावले मुकुंद रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय रावराणे यांनी वर्षभरात आपल्या अध्यक्षपदाच्या काळात रोटरीतर्फे राबविल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रोटरी क्लब तर्फे वैभववाडीत रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू उदाहरणार्थ दप्तर, छत्री, वह्या, पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप, अंध अपंग मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, उत्तम समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, पाककला, फुगडी, रस्सीखेच, निबंध, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धा घेतल्या. रोटरी महोत्सव, रानभाज्या महोत्सव, भरड धान्य प्रदर्शन आणि वाटप, वृक्ष लागवड, महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण, महिलांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकिन वितरण, नवजात बालकांना आणि मातांना पोषक जीवनसत्वांच्या वस्तूंचे वाटप, शाळा आणि महाविद्यालयांस बेंचेस, फळा आणि संगणक वितरण, वैभववाडी बाजारपेठ स्वच्छता, तळेरे कोल्हापूर महामार्गावरील ब्रिजवर आलेल्या झुडपांची स्वच्छता, घाट प्लास्टिक मुक्त स्वच्छता, ग्रामीण रुग्णालय परिसर स्वच्छता, नावळे येथे बंधारा बांधणे इत्यादी अभियान राबविली आहेत.
या व्यतिरिक्त आमच्या क्लबचे सिग्नेचर प्रोजेक्ट
वैभववाडी एस.टी स्टॅण्ड्ला शुद्ध आणि थंडगार पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था.
तालुक्यातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना मोफत अभ्यास पुस्तकांचे वाटप.
यावेळी नुतन प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर यांनी येत्या वर्षात गौरीशंकर धाकूजी यांच्यावतीने वितरित करण्यात आलेल्या २००० झाडांचे रोटरी क्लब वैभववाडी मार्फत वाटप करण्यात आल्याचे सांगितले. तसेच स्त्रियांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन इत्यादी विषयक जागृती आणि तपासणी शिबिरे राबवली जातील. वैभववाडी तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांच्या सूचनेनुसार परीक्षा मार्गदर्शन पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे प्लास्टिक मुक्त होण्यासाठी जनजागृती करून पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यावर भर दिला जाईल. तसेच गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून दिली जाईल असे सांगितले. तसेच रोटेरियन प्रशांत गुळेकर यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या निवडलेल्या नवीन कार्यकारणीची माहिती दिली. ती पुढील प्रमाणे अध्यक्ष प्रशांत गुळेकर, उपाध्यक्ष मनोज सावंत, सचिव सचिन रावराणे, खजिनदार श्रिया धावले, सार्जंट अट आर्म्स प्रशांत कुळये, क्लब एक्झिक्यूटिव्ह सेक्रेटरी विद्याधर सावंत, क्लब फाउंडेशन डायरेक्टर स्नेहल खांबल, क्लब मेंबरशिप डायरेक्टर सलोनी टक्के, क्लब पब्लिक इमेज डायरेक्टर नामदेव गवळी, क्लब सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर मुकुंद रावराणे, क्लब लर्निंग फॅसिलिटी डायरेक्टर मिलिंद मेस्त्री, यंग लीडरशिप डायरेक्टर पूजा सावंत इत्यादींची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.










