कुणबी समाज बांधवांनी दिला मदतीचा हात
श्री जय हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळांनी मानले आभार
चिपळूण (वार्ताहर ): तालुक्यातील खेर्डी शिगवणवाडी येथील सुरेंद्र मारुती शिगवण यांचे गेल्या महिन्यात अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची तीन लहान मुले निराधार झाली. त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावण्यासाठी कुणबी समाज बांधवांना एक हात मदतीचा देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही रक्कम जमा झाली. ही जमा रक्कम श्री जय हनुमान कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ खेर्डी शिगवण वाडी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे कुणबी संघ शाखा चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केली .
अपघाती निधन झालेल्या सुरेंद्र शिगवण यांच्या परिवाराची परिस्थिती हलाकीची आहे. या परिवाराला समाजातील अनेक व्यक्तीं सहाय्य करत आहेत. श्री जय हनुमान कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सुद्धा या कुटुंबाला मोठा आधार देण्यात आलेला आहे. या निराधार मुलांना काही आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी पत्रकार संतोष कुळे आणि सहकारी यांनी समाजातील बांधवांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत चिपळूण, खेड आणि मुंबई येथील समाज बांधवांनी आपली आर्थिक मदत जमा केली.
ही सर्व जमा झालेली मदत कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूणचे पदाधिकारी संजय जाबरे, भरत धुलप, हर्षल कुळे, नितेश खाडे, विजय घाणेकर आणि विजय शिगवण या सर्वांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली . यावेळी रुपेश शिगवण, योगेश शिगवण आणि मंडळाचे काही पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्या कुटुंबातील लहान मुलांची भेट घेतली. मंडळाने समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.












