खेड(प्रतिनिधी) अनेकदा अपघात झाल्यानंतर संबंधित वाहनाचा विमा, वाहन परवाना, चालकाचा परवाना वा तत्सम कागदपत्रे तपासण्याचे काम वाहतूक विभाग व पोलिसांकडून करण्यात येते. मात्र, औद्योगिक वसाहतीत जोखमीची कामे करणाऱ्या वाहनचालक वा मालकांकडे अशा प्रकारची कोणतीच कागदपत्रे नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवजड वाहनांचा अपघात झाल्यास अडचणी निर्माण होता. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत. या औद्योगिक वसाहतीत जसे उत्पादन केलेल्या मालाची वाहतूक करणे वा कच्चा माल घेऊन येणारे वाहन हे वाहतूक विभागाच्या निकषावर बंधनकारक असण्याची आवश्यकता असते. तसेच इथे वसाहतीच्या विविध विभागात काम करणाऱ्या वाहनांनाही हा नियम लागू
होतो. मात्र, या परिसरातील विविध विभागात काम करणारे डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन मशीन, फराना, हायड्रा, क्रेन, टँकर या वाहनांची कागदपत्रे नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपघात झाल्यास काही मालक ‘आम्हाला अशा कागदपत्रांची गरज नसते,’ असेही सांगत असल्याची चर्चा औद्योगिक परिसरात ऐकायला मिळते. वाहनाच्या मालकांकडून अशी उत्तरे दिली जात असल्याने अनेकदा स्थानिक व अपघातग्रस्त यांच्यात वादविवाद घडून अनुचित प्रकार घडण्याची समस्या उद्भवते.
दोन वर्षांपूर्वी एका पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरखाली एक वृद्धा चिरडल्याची घटना घडली होती. तर १५ दिवसांपूर्वी एका वृद्धावर क्रेनखाली जीव गमावण्याची वेळ आली होती. संबंधित वाहनाची कागदपत्रेच नसल्याची बाब अपघातानंतर समोर येते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील अन्य वाहनांबरोबरच अवजड वाहनांचीही वाहतूक विभागाकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.











