खेड (प्रतिनिधी) खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या खेड बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील बस स्थानकाची साफसफाई न झाल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून बसस्थानकावरील स्वछता कर्मचारी नक्की असून नासक्यासारखेच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खेड बसस्थानकावर तालुक्यातील ग्रामीण भागातून मुंबई पुणे ठाणे या मार्गावर जाण्यासाठी प्रवासी येत असतात मात्र गेल्या चार दिवसांपासून बसस्थानकावरील कचराच साफ केला जात नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानकाच्या स्वच्छतेसाठी खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. मात्र या कंपनीच्या कामगारांकडून स्वछता होत नसल्याची गंभीर बाब पुढे येत आहे. यामुळेच खेड बसस्थानकाची स्वच्छता सध्या रामभरोसे असून खेड बसस्थानकावरील या विदारक परिस्थितीकडे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक श्री. बोरसे लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारत असून स्वच्छतेच्या कामात दिरंगाई करणारया कंपनीचा ठेका रद्द करण्याबाबत लवकरच येथील प्रवासी संघटना विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांची भेट घेणार आहेत.











