राजापूर तालुक्याचे काम अव्वल
राजापूर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हयात राजापूर तालुका आघाडीवर आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना तालुक्यात या योजनेसाठी तालुक्यात पात्र असणारी एकही महिला वंचित रहाणार नाही याची खबरदारी घ्या अशा सुचना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसह लाडकी लेक, वयोश्री योजनेसह शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्व लाभार्थींना प्राधान्याने द्या असेही ना. सामंत यांनी यावेळी नमुद केले.
शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ गुरूवारी राजापूरात ना. सामंत यांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला. यावेळी नाम. सामंत बोलत होते.
राजापूर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे, राजापूरच्या प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने, तहसीलदार सौ. शितल जाधव, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दिपक नागले, राजापूर शहर प्रमुख सौरभ खडपे, महिला शहर प्रमुख हर्षदा खानविलकर, युवा सेना तालुका प्रमुख सुनिल गुरव, महिला सघटक सिद्धी शिरसेकर, पाचल विभाग प्रमुख शैलेश साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजापूर शहर व ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरल्याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तर यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात महिलांना अर्ज भरता यावेत यासाठी प्रशासनाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये अर्ज भरून घेणे, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र देणेत आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी वैशाली माने यांनी केले तर आभार तहसीलदार सौ. शितल जाधव यांनी मानले. याप्रसंगी सर्व प्रशासकिय अधिकारी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी उपस्थित होते.









