चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डेरवण येथील इयत्ता नववीत शिकणारी एक मुलगी ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली. अचानक घडलेल्या या आघातामुळे मोहीते कुटूंबीय कोलमडून गेले. या कुटूंबियांना धीर देत डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून मदत म्हणून २५ हजार रुपयांचा धनादेश मोहीते कुटूंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
डेरवण बौध्दवाडीत राहणारी आणि मूळ संगमेश्वर या तालुक्यातील कळंबस्ते या गावात राहणारी श्रावणी सुधीर मोहीते (वय १४ ) ही विद्यार्थ्यींनी डेरवण येथे आपल्या आजोळीच शिक्षणा निमित्त राहते. तिच्यासोबत तिची आई व छोटी बहीण देखील येथेच राहते. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात घरानजीकच्या ओढ्यावरील लोखंडी साकवा वरुन पलीकडे जात असताना ती पाय घसरून ओढ्यात पडली. मुसळधार पाऊस आणि ओढ्याच्या वाहत्या पाण्यातून ती वाहत गेली. ती वाहून जात असताना काही ग्रामस्थांनी तिला पाहिले. परंतु त्या मुसळधार पावसात ओढ्याच्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहात ती काही सेकंदातच दिसेनाशी झाली. हा ओढा पुढे सावर्डे येथील कापसी नदीला जाऊन मिळतो. त्या कापशी नदीच्या पात्रात सुमारे सव्वा तासानंतर तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे डेरवण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली. मोठ्या मुलीच्या रूपाने मोहिते कुटुंबांचा एक आधारवडच निघून गेला. त्यामुळे डेरवणच्या श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोहिते कुटुंबीयांना मदतीचा धनादेश रुग्णालयाच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डेरवणचे पोलीस पाटील माधव गुजर, मिलींद यशवंतराव, अनंत चव्हाण, विजय कदम,
अभिषेक सावंत, प्रतिक मोहिते, संतोष वायकूळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.










