दिवाणखवटीजवळ रेल्वेगाड्यांसाठी ताशी २० कि.मी. ची मर्यादा

 

 

खेड(प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्याजवळ कोसळलेल्या मातीच्या भरावासह दरडीमुळे मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील मार्गस्थ होणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दुर्घटनेनंतर सलग तीन दिवस ताशी १० कि.मी.च्या वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या. या वेगात आणखी वाढ करण्यात आली. सद्यस्थितीत दिवाणखवटी बोगद्याजवळून मार्गस्थ होणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या ताशी २० कि.मी. वेगाने धावत आहेत. दुर्घटना स्थळावर रेल्वे कर्मचाऱ्यांनीही करडी नजर ठेवली आहे.

 

कोकण रेल्वेच्या २९ वर्षांच्या इतिहासात दिवाणखवटी बोगद्याजवळ पहिल्यांदाच मातीच्या भरावासह दरड कोसळून कोकण मार्ग ठप्प झाला. पावसाच्या थैमानामुळे एकामागोमाग एक मातीच्या भरावासह दरडी कोसळत राहिल्याने मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी तब्बल २६ तासांचा अवधी लागला होता. दिवाणखवटी बोगद्याजवळ घडलेल्या दुर्घटनेने कोकण मार्गावरील वाहतुकीला पूर्णत: ब्रेक लागून प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

 

तब्बल २६ तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यात रेल्वेच्या आपत्कालीन . यंत्रणांना यश आले. मात्र अजूनही कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. उशिराने मार्गस्थ होणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांच्या मार्गात मनस्ताप कायम आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळ पुन्हा दुर्घटनेची

पुनरावृत्ती होवू नये, याकरिता कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी व यांत्रिकी विभागाने सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. अंतिम निष्कर्षाअंती योग्य त्या उपाययोजनांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर पावसाळी वेळापत्रकानुसार मर्यादा घालण्यात आल्या आहेत. यापाठोपाठच दिवाणखवटी बोगद्याजवळून मार्गस्थ होणाऱ्या सर्बच रेल्वेगाड्यांच्या लोकोपायलटना ताशी २० कि.मी. वेगाने गाड्या मार्गस्थ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणाहून मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांवर घालण्यात आलेली वेगाची मर्यादा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.