रत्नागिरी– कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या सहकार्याने आणि नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख नियोजनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात रविवारी कार्यक्रम झाला. सुरुवात दीपप्रज्ज्वलन आणि सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमात गुरु महिमा सांगणारे गीत उपकेंद्रातील विद्यार्थी व शिक्षकांकडून सादर करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध व्यावसायिक व नाट्यकर्मी राजन मलुष्टे आणि ज्येष्ठ नाट्य कलाकार विजयकुमार रानडे यांची उपस्थिती होती. या वेळी या दोन्ही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गुरु शब्दाचे महत्त्व विशद करतानाच ज्ञानाची शिदोरी देखील दिली.
नाट्यकर्मी राजन मलुष्टे म्हणाले की, गुरु हा नेहमीच जीवनात मार्गदर्शन करतो. गरज आहे ती फक्त आलेल्या संधीच सोन करण्याची. त्यामुळे नेहमीच ज्ञान संपादित करण्याची अंगी वृत्ती हवी. प्रत्येकाने उघड्या डोळ्याने जग पाहायला शिकले पाहिजे. समाज आणि जग यांकडून व्यक्ती सतत शिकत असते.
ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. रानडे म्हणाले की, नाटकाच्या दृष्टीने आवाज व त्यातील नियंत्रण अत्यंत गरजेचे असते. यामुळे आपल्या आवाजावर संयम ठेवून नटाला मिळणाऱ्या पात्रानुसर त्याचा वापर करावा. या वेळी नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी खास ओमकाराचे प्रात्यक्षिक देखील घेतले. यानंतर नाट्यशास्त्र प्रशिक्षक डॉ. शशांक पाटील यांनी नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगताना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाटकाची साधना निर्मळ मनाने करा असा गुरुमंत्र दिला.
नाट्यशास्त्र विभागाकडून लक्षवेधी नृत्य सादर करण्यात आले. याखेरीज रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील प्राध्यापक अविनाश चव्हाण यांनी गुरु शब्दाचा अर्थ, महर्षी व्यास यांचे कार्य आपल्या खास अभंगवाणीतून उलगडले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी गुरु शब्दामागील विचार आणि आपल्या जीवनातील गुरूचे स्थान नेमक्या शब्दात सांगितले.
कार्यक्रमाला नाट्यशास्त्र सहाय्यक प्राध्यापिका ऍड रजनी सरदेसाई, संगीत मार्गदर्शक विजय रानडे आदी मान्यवर मंडळी तसेच रत्नागिरी उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. सोनीया पाटील यांनी केले. सौ. अनघा नागवेकर यांनी आभार मानले.











