माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष
तातडीने कार्यवाही करण्याची कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांची ग्वाही
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरातील गंजलेले पोल व पुराच्या पाण्यामुळे बंद करावे लागणारे विजट्रान्सफरमर व अन्य विजसमस्यांबाबत पुन्हा एकदा राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी महावितरणचे लक्ष वेधले आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांची भेट घेऊन ही कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी केली आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता यांनी महावितरणचे राजापूरचे कार्यकारी अभियंता अमोल डांगे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून यावर कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत. तशी माहिती अॅड. खलिफे यांनी दिली आहे.
राजापूर शहरामध्ये सन २०१८ पासून रत्नागिरी जिल्हामध्ये प्रथमच भूमिगत विद्युत वाहिनीचे काम काम सुरु झाले होते. सदरचे काम मक्तेदार यांचे चालढकलपणामुळे खुप उशिरा व निष्कृष्ट झालेले असल्याने सदर कामाबाबत यापूर्वीही आपण स्वतः लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. सदरची योजना राबविताना शहर विकासाच्या दृष्टीने जवाहरचौक ते नगर बाचनालय हा भाग भूमीगत करून तेथील रहदारीस धोकादायक पोल हटविण्याचा उद्देश होता.
सततच्या पाठपुराव्यामुळे सदरचे काम पूर्ण झाले असून देखील गेल्या चार वर्षात जवाहरचौक, कुशे मेडीकल, चौगुले फार्मसी व नगर वाचनालय येथील धोकादाय विदयुत पोल हटविण्यात आलेले नाहीत. त्यावर जुनाट विदयुत वाहिन्या देखील तशाच आहेत. सदरचे पोल जवाहरचौक ते नगर वाचनालय या अरुंद रस्त्यावर असून दोन वाहने जाताना खुप अडचण व धोकादायक अशी आहेत. यावर वाहन धडकून भविष्यात जिवीतहानी व आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर जवाहरचौक, कुरो मेडिकल, चौगुले फार्मसी व नगर वाचनालय येथील विद्युत पोल हटविण्यात यावेत व भूमिगत विद्युत वाहिन्या चालू करणेत याव्यात किंवा पर्याय म्हणून एरियल बंच कन्डक्टरची व्यवस्था करणेत यावी. अन्यथा भविष्यात होणा-या जिवीतहानी व आर्थिक नुकसानीला आपला विभाग जबाबदार राहील असे खलिफे यांनी साळी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
तर राजापूर शहरात पावसाळी हंगामामध्ये अर्जुना व कोदवली नद्यांना पूर येऊन शहरातील बाजारपेठ व प्रमुख रस्ते पाण्याखाली जातात. गेल्या आठवडयात झालेल्या अतिवृष्टीत शहरामध्ये अचानकपणे नदीचे पाणी शिरले व पूर परिस्थिती निर्माण झाली, यावेळी पूर्ण रात्र नदीकाठच्या नागरिक, व्यापारी यांना जागून काढावी लागली. यावेळी शहरातील प्रामुख्याने शहर बाजारपेठ, आंबेवाडी, कोंडेतड येथील ट्रान्सफार्मर हे पाण्याखाली जात असल्याने आपलेकडून विदयुत पुरवठा खंडीत केला जातो त्यामुळे या भागातील नागरिकांना पुरपरिस्थितीत अंधारात रहावे लागते. यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून पुर काळातही विजपुरवठा सुरू राहिल याची दक्षता घेणे आवश्यक आहे असे अॅड. खलिफे यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही श्री. साळी यांनी दिली आहे. यासाठी आवश्यक ती पुर्तता व कार्यवाही करण्याच्या सुचना श्री. साळी यांनी डांगे यांना दिल्या असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले.









